
नागपूर : २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी करून देवेंद्र फडणवीसांनी एक धक्का दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग करून शरद पवारांनी जोरदार धक्का दिला होता. आता २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी ५० आमदार पळवून मोठा धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री बनवून भाजपच्या वरिष्ठांनी सर्वांनाच जबर धक्का दिला आहे.
भाजपच्या (BJP) धक्कातंत्राची धास्ती प्रत्येकाने घेतलेली दिसते. पण ओबीसींचा मुद्दा ऐरणीवर असताना माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना मंत्रिमंडळातून डावलणे अवघड असल्याचे राजकीय वर्तुळात बोले जात आहे. राज्यात युतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर आता नागपूरमधून कोण मंत्री होणार याचीच सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. प्रत्येकाचा समर्थक आपलाच ‘भाऊ‘मंत्री होणार असल्याचा दावा करीत आहेत. मात्र भाजपमध्ये सुरू असलेल्या धक्कातंत्राची धास्ती अनेकांनी घेतली आहे. मंत्रिपदासाठी आमदार प्रवीण दटके आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
२०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे तसेच विनोद तावडे यांना या बड्या नेत्यांना घरी बसवून सर्वांनाच धक्का दिला होता. या धक्क्याचा ‘मी पुन्हा येईन’, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच जबर धक्का बसला होता. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करून सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांचा सुखाचा संसार सुरू असताना फडणवीस यांनी दिलेल्या जबरदस्त धक्क्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
एवढेच नव्हे तर तब्बल ४० आमदार पळवून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला. राज्यातील नव्या युतीचे शिल्पकार फडणवीस यांना भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी धक्का देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश आमदार, नेते व कार्यकर्ते फडणविसांच्या बाजूने असले तरी मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होईल, याची धाकधूक सर्वांनाच लागली आहे. युतीच्या काळात ऊर्जामंत्री व अबकारी मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेत पाठवून पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी सध्या सर्वांसोबतच जुळवून घेतले आहे.
जातीय समीकरण आणि ओबीसींचा मुद्दा ऐरणीवर असताना बावनकुळे यांना डावलणे अवघड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नागपूर महापालिकेची निवडणूक आणि ओबीसी चेहरा म्हणून भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. रामटेकचे आमदार शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री होतील, असा दावा केला जात आहे. पण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर ३०० कोटी रुपयांच्या खनिकर्म घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यामुळे ते निश्चित नाही, असेही काहींचे म्हणणे आहे.
संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत असेलेले समीर मेघे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मिरवणूक व जंगी स्वागतात कुठेच दिसले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीवर रोज तुटून पडणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या ‘सिनिॲरिटी’ची दखल घेतली जाणार असल्याचे दावे त्यांचे समर्थक करीत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.