सरकार नाही म्हणून काय झाले? ‘आम्ही आहोत ना...’ म्हणत शेतकऱ्यांसाठी सरसावली मनसे !

राजू उंबरकर यांनी आपल्या स्तरावर ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना’ त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात सुरू केली आहे.
Raju Umbarkar and Raj Thackeray MNS
Raju Umbarkar and Raj Thackeray MNSSarkarnama

नागपूर : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यात सरकार स्थापन केली. तेव्हापासून ते दोघेच कारभाराचा गाडा हाकताहेत. मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे पूरपरिस्थितीत राज्य अनाथ झालंय, अशी टिका केली जात आहे. सरकार नाही म्हणून काय झाले, आम्ही आहोत ना..., असे म्हणत अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे (MNS) धावून आली आहे.

तब्बल एक महिना झाला विदर्भात सूर्यनारायण अभावानेच दिसले. पुराने सर्वत्र थैमान घातले. अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले. आभाळच फाटल्यावर ठिगळ कुठे लावणार, असा प्रश्‍न विचारत शेतकरी रोज रडतोय. पण त्याचे अश्रू पुसायला कुणी नाही. आत्तापर्यंत तर मुख्यमंत्री आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पाहिजे होते. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीच्या वाऱ्या करीत आहेत. आणि शेतकरी इकडे वाऱ्यावर (पाण्यावर) सोडला आहे. नाही म्हणायला पंचनामे करण्याचे काम सुरू झाले. पण त्याचा अहवाल तयार होईल, मग तो पुढे जाईल, तोपर्यंत काय, या प्रश्‍नाचे उत्तर कुणीही द्यायला तयार नाही.

अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांनी आपल्या स्तरावर ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना’ त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात सुरू केली आहे. वणी, मारेगाव आणि झरी जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. सुरुवातीला पाणी न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. तर आता झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे.

Raju Umbarkar and Raj Thackeray MNS
Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

या योजनेमध्ये पुरामुळे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना रब्बी हंगामात उभारी मिळावी, म्हणून उंबरकर शेतकऱ्यांसोबत उभे राहिले आहेत. त्यामुळे वणी उपविभागातील जवळपास ६०० वर शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे, खते कीटकनाशके, यांसह इतर शेतीसाहित्य शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच नेऊन दिले जाणार आहे. याशिवाय दोन टप्प्यांत पाच, पाच हजार, असे एकूण १० हजार रुपये या योजनेत सामावून घेतलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. जेणेकरून अशा परिस्थितीत तो शेतकरी कमीत कमी उभा झाला पाहिजे आणि त्याचे मनोबल वाढले पाहिजे. जगाचा पोशिंदा संकटात असताना मदत तर दूरच पण प्रशासन त्याच्यापर्यंत पोहोचलेले देखील नाही. शेतकरी भयभीत झाला आहे. त्यामुळे त्याला उभारी देण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे, असे राजू उंबरकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

यापूर्वी ७ शेतकरी आम्ही दत्तक घेतलेलेच आहेत. त्यांना बी बियाणे, खते पोहोचविलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पहिला टप्पा वणी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात राबविण्यात येत असल्याचेही उंबरकर म्हणाले. आतापर्यंत प्रशासनच काय कुणीही आमच्यापर्यंत पोहोचले नाही. पण सध्या मिळालेल्या या मदतीमुळे आम्ही थोडेफार का होईना, परिस्थितीतून सावरतो, असे शेतकरी सांगत आहेत. लवकरच सरकारनेही अशी एखादी योजना पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुरू करावी, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.

मनसेतर्फे राजू उंबरकर यांनी पूरपरिस्थितीतच मदतकार्य सुरू केले होते. पुरात अडकलेल्यांना अन्न, धान्याची गरज भागवली जात होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी पण पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले होते. तेव्हा शुद्भ पाणी कॅनमधून गरजवंतांपर्यंत पोहोचवले होते. पण येवढीच लोकांची गरज नाही, तर शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची गरज आहे, हे हेरून मग ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना’ सुरू केल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in