त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत बोलावं लागतं; तरीही मी सौम्य भाषेत बोललो…

त्या मानाने मी खूप चांगली भाषा वापरली. नाही तर याच्यापेक्षाही वाईट भाषेत बोलावं, अशी त्यांची कृती आहे, असेही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

नागपूर : आमचे संत सांगून गेले आहेत की, ‘अशा नरा मोजूनी मारव्या पैजा हजार, मारावी हजार आणि मोजावी एक’, म्हणजे हजार मारा आणि एक मोजा, त्यांची काय पूजा करायची की मिरवणूक काढायची? जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर आम्ही गप्प बसावे का? असा प्रश्‍न करीत त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत बोलावं लागतं. तरीही मी खूप सौम्य भाषा वापरली, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज येथे म्हणाले.

विरोधकांवर टिका करताना तुमच्या भाषेचा स्तर घसरला, असे वाटत नाही का, असा प्रश्‍न विचारला असता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपरोक्त उत्तर दिले. ते म्हणाले, जे महाराष्ट्रद्रोही आहे, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्र (Maharashtra) विषयी द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच मी बोललो. त्यांचे जे कृत्य आहे, त्या मानाने मी खूप चांगली भाषा वापरली. नाही तर याच्यापेक्षाही वाईट भाषेत बोलावं, अशी त्यांची कृती आहे, असेही संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशभरात भाजपविरोधी (BJP) आघाडी होत आहे का, असे विचारले असता, आघाडी वगैरे हे शब्द बदला, या देशांमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका आल्या की आघाडीची चर्चा सुरू होते. काल तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. साडेचार तास उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अनेक विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. देशाचे राजकारणाबद्दलही बोलणे झाले. अनेक विषयांवर सहमतीही झाली आहे. भविष्यात राजकीय दिशा काय असावी, यावरही उभय नेत्यांनी विचारांचे आदानप्रदान केले. भविष्यात या दोन नेत्यांशिवाय इतर अनेक पक्षांचे नेते एकत्रित भेटणार आहेत, असे ते म्हणाले.

कॉंग्रेसला सोबत घेऊनच आघाडी व्हावी..

आम्ही हे कधीच नाही म्हणालो की, काँग्रेसच्या (Congress) शिवाय काही आघाडी बनवायची आहे. उलट जेव्हा ममता बॅनर्जीनी असं सूतोवाच केलं होतं, तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता की, ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. अकांडतांडव करणे ही भाजपची सवय आहे. जेव्हा ते पराभूत व्हायला लागतात, तेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतात. उत्तर प्रदेशात भाजप पराभूत होत आहे. त्यामुळे त्यांचे हे अखेरचे प्रयत्न सुरू आहेत, देशात लोकशाही संपत आल्याचे हे परिणाम आहेत.

चंद्रकांत पाटलांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा..

चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे कुटुंबासोबत आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा, कारण त्यांचा पक्ष दिवसागणिक कणकण झिजतो आहे आणि संपत आहे.

आयुक्तांना सहज भेटलो..

महाआयटी घोटाळ्यात नाव पुढे आलेल्या अमोल काळेंबद्दल विचारले असता, काल नागपूरच्या पोलीस आयुक्तांना भेटलो. ती सदिच्छा भेट होती. ते मुंबईलाही अधिकारी राहिलेले आहे. म्हणून नागपुरात आल्यावर त्यांना भेटलो. ज्यांची (अमोल काळे आणि अजय ढवंगले ) नावं तुम्ही घेत आहात. त्यांची माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही तयार आहे आणि त्यांच्या संदर्भात लवकरच बोलेन. शक्यतो नागपूरला येऊनच बोलेन, असे राऊत म्हणाले. नागपूर नक्कीच आता बदललेले आहे. कोरोनामुळे नागपुरात येऊ शकलो नाही. मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेऱ्या वाढतील, असेही ते म्हणाले.

विदर्भाकडे आमचं लक्ष नाही असं नाही, विदर्भात आम्ही लक्ष घालतोय, कालच माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, विदर्भात आम्ही संघटनात्मक बदल करतोय. मधल्या काळात मुख्यमंत्र्यांची तब्येत थोडी बरी नव्हती. मात्र आता ते काही संघटनात्मक बदल करणार आहेत, ते लवकरच आपल्याला दिसतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in