Wardha Loksabha : पहेलवान खासदार रामदास तडस हॅट्रिक मारतील, की...

Congress : कॉंग्रेसमध्ये उमेदवार बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
MP Ramdas Tadas
MP Ramdas TadasSarkarnama

MP Ramdas Tadas News : पुढील वर्षी २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यावेळी कोणकोणत्या पक्षांकडून कोण-कोण उमेदवार असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसमध्ये उमेदवार बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर भाजपकडे दुसरा तगडा उमेदवार आजच्या तारखेत तरी नाही. त्यामुळे दोन वेळा निवडून आलेले खासदार रामदास तडस लोकसभा लढतील, हे जवळपास निश्‍चित आहे. (It is almost certain that MP Ramdas Tadas will contest the Lok Sabha)

२०१९च्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून चारूलता टोकस लढल्या होत्या. तेव्हा रामदास तडस यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. रामदास तडस यांना पाच लाख ७८ हजार ३६४ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कॉंग्रेसच्या टोकस यांना तीन लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. एकूण मतांच्या ५४ टक्के मते ही तडस यांनी घेतली होती. २०२४च्या निवडणुकीत मतदारांमध्ये वाढ झाली तरी जवळपास दोन लाख मतांचा फरक कॉंग्रेसला भरून काढण्यासाठी तगडी रणनीती आखावी लागणार आहे. त्यासाठी पुढील निवडणुकीत उमेदवार बदलावा लागेल, असे कॉंग्रेसमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे.

वर्धा हा मतदारसंघ आघाडीमध्ये पूर्वापारपासून कॉंग्रेसकडे राहिलेला आहे. पण २०२४मध्ये ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. (महाविकास आघाडी तोपर्यंत टिकली तर..) अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले सुबोध मोहिते वर्ध्यातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यासच ते शक्य आहे. कॉंग्रेसला ही जागा मिळाली आणि उमेदवार बदलवण्याचेही ठरले तर आजघडीला कॉंग्रेसकडे तडस यांना मात देईल, असा ताकदीचा उमेदवार नाही. त्यातल्या त्यात माजी आमदार शरद काळे यांचे चिरंजीव अमर काळे यांच्याकडे कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून पाहता येईल. असे झाले तर निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत.

वर्धा लोकसभा मतदारसंघात तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यानंतर माळी, कुणबी समाजाची लोकसंख्या आहे. ही मते निर्णायक ठरू शकतात. रामदास तडस तेली समाजाचे आहेत. त्याचा फायदा त्यांना मागील दोन्ही निवडणुकांमध्ये झालेला आहे. भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. लोकसभेची भाजपची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेली आहे. केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेच्या मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. त्यांचा एक-एक दौरासुद्धा झालेला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे बूथ स्तरापर्यंतची त्यांची यंत्रणा आजच तयार आहे. कॉंग्रेस त्या तुलनेत तयारीच्या बाबतीत बॅकफुटवर दिसते आहे.

MP Ramdas Tadas
Amravati Loksabha : नवनीत राणांसमोर सध्यातरी नसणार कुणाचेच आव्हान, कारण महाविकास आघाडीचे ठरलेच नाही !

लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना त्यात येणारे विधानसभा मतदारसंघ विचारात घ्यावे लागतात. वर्धा मतदारसंघात वर्धेतील हिंगणघाट, वर्धा, देवळी व आर्वी आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी-वरूड हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा पैकी चार मतदारसंघ भाजपकडे आहेत. त्यामध्ये धामणगावचे आमदार प्रताप अडसड, आर्वी दादाराव केचे, हिंगणघाट समीर कुणावार आणि वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर आहेत. देवळीतून कॉंग्रेसचे रणजीत कांबळे, तर मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार आहेत. भुयार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आमदार झाले होते. सद्यःस्थितीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत.

MP Ramdas Tadas
Ravikant Tupkar News : ...तर रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधवांना चितपट करतील; आघाडी वज्रमुठ आवळणार?

मोर्शी विधानसभा मतदारसंघात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्राबल्य होते. सध्या एक हर्षवर्धन देशमुख सोडले तर राष्ट्रवादीचे दुसरे सक्रिय म्हणावे असे नेते तेथे नाहीत. येथे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवाराला जास्त संधी आहे. पण जातीय समीकरणांचा विचार केल्यास मोर्शी, देवळी, धामणगाव हे तीन मतदारसंघ रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्यासाठी महत्वाचे आहेत. भाजपमध्ये (BJP) उमेदवार बदलण्याचा प्रश्‍नच नाही. कारण त्यांच्याकडे दुसरा तगडा उमेदवार नाही आणि कॉंग्रेस (Congress) किंवा एकूणच महाविकास आघाडीचे निश्‍चित काही ठरलेले नाही. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेल की नाही, याबाबतीतही विभिन्न मतप्रवाह आहेत. त्यामुळे रामदास तडस यांना २०२४मध्ये हॅट्रिक चान्स आहे, असे म्हणता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in