व्हाया मुंबई दिल्लीत तुपकरांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट, पीयूष गोयलांचे आश्‍वासन...

मागण्यांबाबत आपण सकारात्मक असून केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी रविकांत तुपकरांना दिली.
व्हाया मुंबई दिल्लीत तुपकरांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट, पीयूष गोयलांचे आश्‍वासन...
Ravikant Tupkar with Piyush Goyal, Supriya Sule and OthersSarkarnama

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळण्यासाठी बुलडाण्यातून आंदोलनाची सुरूवात करून ते नागपुरात पोहोचवले. पुन्हा बुलडाण्यातच त्यांचे उपोषण सोडवण्यात आले. पण या आंदोलनाचा इम्पॅक्ट व्हाया मुंबई दिल्लीत होत आहे. आता सोयापेंड आयात करणार नाही, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) दिले आहे.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मागण्या आता दिल्ली दरबारी पोहोचल्या आहेत. रविकांत तुपकर यांनी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. सोयापेंड आयातीचा घातकी निर्णय घेऊ नका, अशी मागणी तुपकरांनी गोयलांना केली. यावर सोयापेंड आयातीचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले, पण यासंदर्भात लेखी आदेश काढावा, अशी आग्रही मागणी तुपकरांनी केली. यासोबतच सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या महत्वपूर्ण मागण्यांवर दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली. या सर्व मागण्या आणि समस्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी मंत्री गोयल यांनी सांगितले.

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आज दिल्ली येथील संसदेतील कार्यालयात केंद्रीय पीयूष गोयल यांची भेट घेतली. पोल्ट्री असोसिएशनने सोयापेंड आयातीचा आग्रह धरला आहे, तर साऊथमधील टेक्स्टाइल लॉबीने कापूस आयातीवरील कर कमी करण्याची व निर्यात बंदी लावण्याची मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने या लॉबीच्या दबावाखाली असा निर्णय घेतल्यास तो शेतकऱ्यांसाठी मारक ठरेल. त्यामुळे सोयापेंड आयातीचा घातकी निर्णय घेऊ नका, अशी विनंती तुपकरांनी गोयल यांच्याकडे केली. सोयापेंड आयातीचा आमचा कोणताही इरादा नसल्याचे गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बाबतीत लेखी आदेश काढावा, अशी आग्रही मागणी यावेळी तुपकरांनी लावून धरली. पामतेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावे, कापसावर निर्यातबंदी लावू नका, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करा अशा महत्वपूर्ण मागण्या तुपकरांनी केल्या. अतिवृष्टीने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट आली असून उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे, त्यासाठी सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती तुपकरांनी केली असता या मागण्यांबाबत आपण सकारात्मक असून केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही गोयल यांनी रविकांत तुपकरांना दिली.

Ravikant Tupkar with Piyush Goyal, Supriya Sule and Others
आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या ना. गोयल यांनी यावेळी सविस्तरपणे जाणून घेतल्या, तुपकरांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली, त्यामुळे सोयाबीन-कापूस प्रश्नावर रविकांत तुपकरांनी उभारलेला लढा आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. मंत्री पीयूष गोयल यांच्या भेटीने आणि सकारात्मक चर्चेने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश येऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा बळावली आहे, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

अन् सुप्रिया सुळेंनी रोखले..!

रविकांत तुपकर पीयूष गोयल यांची भेट घेऊन संसद कार्यालयातून बाहेर पडत असताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अचानक आवाज देऊन तुपकरांना रोखले. तेथे उपस्थित खासदार श्रीनिवास पाटील, खासदार जया बच्चन, (Jaya Bacchan) खासदार फौजीया खान यांच्याशी तुपकरांची ओळख करून देत सोयाबीन-कापूस प्रश्नासाठी तुपकरांनी केलेल्या आंदोलनाची माहिती त्यांनी उपस्थित खासदारांना दिली. रविकांत हे महाराष्ट्रातील धडाडीचे नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले. चळवळी टिकल्या पाहिजे, यासाठी चळवळीतील नेतृत्वाची समाजाची काळजी घेणे आवश्यक आहे. जीव धोक्यात घालून आंदोलन करू नका, असा सल्ला यावेळी श्रीनिवास पाटील यांनी तुपकरांना दिला. जया बच्चन, फौजीया खान यांनीही तुपकरांच्या आंदोलनाबाबत आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेबाबत त्यांचे कौतुक केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.