BJP : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’ !

घाटा सोसण्यास तयार नसलेल्या कंपन्यांनी महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली, असा आरोपही भाजपचे (BJP) आमदार प्रवीण दटके यांनी केला.
Pravin Datke, BJP
Pravin Datke, BJPSarkarnama

नागपूर : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत आहे. ठाकरे सरकारच्या काळात या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा, असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी दिले आहे.

अडीच वर्षांच्या काळात ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने केवळ वाट्याचाच विचार केल्याने घाटा सोसण्यास तयार नसलेल्या कंपन्यांनी महाराष्ट्रातून (Maharashtra) गाशा गुंडाळण्याची वेळ आली, असा आरोपही भाजपचे (BJP) आमदार प्रवीण दटके (MLA Pravin Datke) यांनी केला. महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) पक्षांचे कार्यकर्ते खंडणी वसुली करत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, याची आठवण करून देत आमदार दटके म्हणाले की, वेदान्ता-फॉक्सकॉन कंपनीसोबत चर्चा करण्याऐवजी वाटाघाटी साठीच ठाकरे सरकारचा पाठपुरावा सुरू झाल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याखेरीज या कंपनीला पर्यायच राहिला नसावा.

फडणवीस सरकारच्या काळात गुंतवणुकीसाठी अव्वल असलेल्या महाराष्ट्रातून गाशा गुंडाळायला मविआ सरकारने भाग पाडल्याने गुंतवणुकीला मोठा फटका बसला असून पुन्हा महाराष्ट्राचे अव्वल स्थान मागे पडले आणि महाराष्ट्राची जागा कर्नाटकने घेतली. मविआ सरकारच्या वसुली धोरणाचा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने धसका घेतला असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध करून वसुली आणि तोडपाणी करण्याची सवय महाराष्ट्राला नवी नाही, असा टोलाही त्यांनी मारला. सरकारमधील तीन पक्षांचे समाधान करणे परवडत नसल्यामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा.

Pravin Datke, BJP
'प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे.. हे तर भोंदू हृदयसम्राट' : भाजप नेत्याची खोचक टीका

गेल्या अडीच वर्षांतील धोरण लकवा आणि वसुलीच्या तगाद्याला कंटाळून अनेक गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविली असून महाविकास आघाडी सरकारच्या वसुली धोरणामुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ठाकरे सरकारच्या काळात ओलाचा प्रकल्प अधांतरी राहिला, टेस्लाने पाठ फिरविली, एमआयडीसीमधील किती उद्योग ठाकरे सरकारच्या काळात बंद पडले, यावर संशोधन करायला हवे. दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारवर आगपाखड करून आपल्या पापावर पांघरूण घालणाऱ्या मविआने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in