हातरुण जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत 'वंचित'चा विजय; शिवसेनेला धक्का...

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीच्या अश्विनी गवई यांना २६६० मते मिळाली आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस एकटी लढली होती.
हातरुण जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत 'वंचित'चा विजय; शिवसेनेला धक्का...
ShivsenaSarkarnama

मनोज भिवगडे - जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेवर मात करत हे सर्कल आपल्या ताब्यात घेतले आहे. काल हातरुण सर्कलसाठी मतदान झाल्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या लीना शेगोकार ह्या ४३०१ मते घेऊन विजयी झाल्या आहेत.

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीच्या अश्विनी गवई यांना २६६० मते मिळाली आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस एकटी लढली होती. जिल्हा परिषदेच्या बाळापूर तालुक्यातील हातरूण सर्कलमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सदस्या सुनिता गोरे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे या सर्कलसाठी पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व वंचितच्या उमेदवारांमध्येच थेट लढत पाहायला मिळाली. तर एक अपक्षही उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या मैदानात होता.

या निवडणुकीवर जिल्हा परिषद मधील सत्ता समीकरण अवलंबून असल्याने ही निवडणूक सत्ताधारी वंचित व विरोधातील इतर पक्षांसाठी अतिशय महत्वाची मानली जात होती. दरम्यान आजच्या निकालानंतर वंचितच्या लीना शेगोकार यांना ४३०१ मते मिळाली तर शिवसेनेच्या अश्विनी गवई २६६० मते, भाजपच्या राधिका पाटेकर यांना २०९१ मते आणि काँग्रेसच्या रशिका इंगळे यांना ३६२ मतं घेता आली. त्यामुळे या निवडणुकीत वंचितच्या शेगोकार ह्या १६४१ मतांनी विजयी झाल्या..

तर वंचित बहुजन आघाडी सत्ता राखेल?

अकोला जिल्हा परिषदेचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने जुलै महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडणुका होणार आहेत. ५३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषद मध्ये सत्ता काबीज करण्यासाठी २७ सदस्यांची गरज लागणार आहे. वंचितेची आजच्या विजयानंतर २५ सदस्यसंख्या झाली आहे. मात्र तरीही वंचित बहुजन आघाडीला आणखी दोन सदस्यांची गरज लागणार आहे. दरम्यान गेल्या निवडणुकीत भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याने वंचितने सत्ता काबीज केली होती. दरम्यान जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Shivsena
भाजपच्या महाडिकानंतर शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला!

शिवसेनेसह आमदार देशमुख यांना धक्का..

सन २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी झाले होते. त्यांनी गत दहा वर्षांपासून वंचितच्या ताब्यात असलेला मतदारसंघ काबीज केला होता. तेव्हापासूनच या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत वंचित विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतो. पोट निवडणूकही आमदार देशमुखांसह शिवसेना आणि वंचितने प्रतिष्ठेची केली होती. दोन्ही बाजूने प्रचंड फिल्डींग लावण्यात आली. मात्र वंचितचा झालेला दणदणीत विजय आणि शिवसेनेचा दारुण पराभव हा देशमुख यांच्यासह शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच शिवसेनेची नवीन कार्यकारिणीत दोन जिल्हा प्रमुख झाले. त्यातील एक जिल्हा प्रमुख म्हणून बाळापूर व मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी आ देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा पक्षासाठी चिंतनाचा विषय ठरला आहे.

पोटनिवडणुकीनंतर जिल्हा परिषद मधील पक्षीय बलाबल-

वंचित बहुजन आघाडी(अपक्षासह): 25

शिवसेना : 12

भाजप : 05

काँग्रेस : 04

राष्ट्रवादी : 04

प्रहार : 01

अपक्ष : 02

महाविकास आघाडी (23)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in