वडेट्टीवार-धानोरकरांनी काढली उणीदुणी, बाळासाहेबांनी सांगितले एकीचे बळ...

पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नेत्यांच्या कानाला लागू नका, पक्षाच्या कामाला लागा, असा सल्ला काँग्रेस (Congress) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
Balasaheb Thorat at Chandrapur
Balasaheb Thorat at ChandrapurSarkarnama

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्यातील रुसव्या-पुगव्यांच्या कॉंग्रेसच्या वर्तुळातील चर्चांना अखेर पुष्टी मिळाली. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज चंद्रपुरात झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात नेत्यांनी नाव न घेता एकमेकांवर टीकास्त्र सोडले. शेवटी समारोपीय भाषणात थोरात यांनी पालकमंत्री, खासदार आणि आमदारांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला.

थोरांतांचा (Balasaheb Thorat) सल्ला या नेत्यांना कितपत पचनी पडला, हे येणाऱ्या काळात दिसणारच आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका (Municipal Corporation)आणि नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांतील दुही समोर आल्याने कॉंग्रेस (Congress) कार्यकर्ते मात्र चांगलेच अस्वस्थ झाले. शकुंतला लॉन येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बाळासाहेब थोरात बोलत होते. मंचावर मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, (Vijay Wadettiwar) मेळाव्याचे आयोजक खासदार बाळू धानोरकर, (Balu Dhanorkar) आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, (Prathbha Dhanorkar) आमदार ॲड. अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, (Atul Londhe) प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार अविनाश वारजुकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते. या मेळाव्यात पालकमंत्र्याचे नाव न घेता खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांनी वडेट्टीवारांवर शाब्दिक बाण सोडले.

समारोपीय भाषणात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी वडिलधाऱ्याची भूमिका घेत पालकमंत्री, खासदार व आमदारांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. एकीचे बळ अधिक असते, एकीचा विजय मोठा असतो, असेही सांगितले. कोरोनाच्या संकटात आपत्ती व्यवस्थापन मंत्री वडेट्टीवार यांनी अतिशय परिश्रमपूर्वक काम करीत खात्याचे महत्व पटवून दिले. आघाडी सरकारने कोरोनात मृतांचे आकडे लपविले नाही, ज्यांनी लपविले त्यांचे आकडे स्मशानभूमी व गंगा नदीत वाहताना दिसले. आज महागाईच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत आहेत. ६० रुपये पेट्रोल व ३५० रुपयांच्या गॅससाठी आंदोलन करणारे भाजप नेते, कार्यकर्ते कुठे लपून बसले आहेत, हे कळायला मार्ग नाही, असे म्हणत भाजपचे राजकारण हे माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणारे आहे, अशीही टिका थोरात यांनी केली.

यावेळी कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी, विदर्भ व नांदेड वगळता नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला सर्वत्र अपयश आले. काँग्रेसला विदर्भात यश मिळवायचे असेल, तर वरिष्ठ नेत्यांनी महिन्याला किमान एक दौरा करावा, असे ते म्हणाले. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याप्रती थेट नाराजी व्यक्त करीत निधी वितरण समप्रमाणात करावे, अशी थेट तक्रार महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली. याप्रसंगी इतरही मान्यवरांची भाषणे झाली. बसप नगरसेवक प्रदीप डे यांच्यासह अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

Balasaheb Thorat at Chandrapur
खासदार धानोरकर म्हणाले, येत्या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करा...

नेत्यांच्या कानाला लागू नका : वडेट्टीवार

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेत्यांच्या कानाला लागू नका, पक्षाच्या कामाला लागा, असा सल्ला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. खासदार व आमदारांच्या भाषणातून पक्षाच्या मेळाव्याला कुणीतरी विरोध करतो आहे, हे दिसते आहे. तेव्हा दोन नेत्यांमध्ये खडा टाकण्याचे काम करू नका. राजकारणात मोठे व्हायचे असेल, तर मनाचाही मोठेपणा लागतो. षड्यंत्र कुणी करत असेल तर हे योग्य नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. अपक्ष आमदार बॅनर पोस्टर लावून काँग्रेसच्या पालकमंत्र्याचे कौतुक करतो. मात्र, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, नेता एक बॅनर लावत नाही, याबद्दल तीव्र नाराजी वडेट्टीवारांनी व्यक्त केली.

Balasaheb Thorat at Chandrapur
Video: आमची विजय वडेट्टीवार यांना कायम साथ; बाळासाहेब थोरात

पक्षांतर्गत विरोधकांना खासदाराचे आव्हान..

खासदार बाळू धानोरकर यांनी आक्रमक शब्दात देशातील सामान्य माणूस हा कर भरतो. मात्र, देशाचे पंतप्रधान मोफत लस दिल्याची जाहिरातबाजी करीत आहे. ही लस मोफत नाही, तर सामान्यांच्या कराच्या पैशांतून झाली आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींवर केली. मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती बंद केली. ओबीसींवर सातत्याने अन्याय सुरू आहे, यावर भाजप बोलायला तयार नाही, अशीही टीका धानोरकर यांनी केली. भाजप सरकार सर्वस्तरावर भ्रष्ट झाले असून, आता तर रशिया व युक्रेनच्या युद्धाच्या नावावर उत्तरप्रदेश निवडणुकीत मोदी मते मागत आहेत, असेही ते म्हणाले. पक्षांतर्गत विरोधकांनी मागून वार करण्यापेक्षा समोरासमोर वार करावे, असे थेट आव्हान धानोरकर यांनी दिले.

Balasaheb Thorat at Chandrapur
आता आणखी काय-काय विकणार आहात : आमदार प्रतिभा धानोरकर

समोरासमोर येऊन लढा : आमदार प्रतिभा धानोरकर

या जिल्ह्यात मंत्री येऊ नयेत म्हणून पक्षातील नेते सक्रिय आहेत. त्याचा परिणाम मंत्री अमित देशमुख, नितीन राऊत सोडले, तर एकही मोठा मंत्री या जिल्ह्यात आला नाही. मध्यंतरी गटबाजीमुळे काँग्रेस पक्ष रसातळाला गेला होता. मात्र, आता जिल्ह्यात पक्षाचा खासदार, आमदार आहे. त्यामुळेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाले आहे. विकासकामात पालकमंत्र्यांचे सहकार्य मिळाले पाहिजे. या जिल्ह्यात येणाऱ्यांना प्रत्येक मंत्र्याला आडकाठी येते. ती येऊ नये, असेही त्या म्हणाल्या. पक्षाचे नेतेच चंद्रपूरमध्ये येऊ नका, असे निरोप मंत्र्यांना देतात. हा प्रकार योग्य नाही. विकासकामे केली, तर एका घरचे दोन नाही चार लोकही पक्षाला चालतात. आम्ही खोटे आश्वासन देणार नाही. तेव्हा पक्षातील विरोधकांनी धानोरकर दाम्पत्यांशी वाद करणे सोडा. समोरासमोर येऊन लढा, असे थेट आव्हान दिले. खासदार या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली म्हणून आम्ही भाजपत जाणार, असे होत नाही. आम्ही काँग्रेसमध्येच राहू, विरोध पत्करून आल्याबद्दल थोरात यांचे अभिनंदन असेही आमदार धानोरकर अतिशय कडक शब्दात बोलल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com