वडेट्टीवार म्हणाले, फडणवीसांच्या म्हणण्यात तथ्य; आडनावावरून जात ठरवणे चुकीचे...

आज सकाळीच ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांशीही याविषयी चर्चा करण्यात आली असल्याचे मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

नागपूर : ओबीसींना आरक्षण देण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करताना काही चुका होत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात आणून दिले. त्यांचे म्हणणे काही अंशी योग्य आहे. राज्यात एकाच आडनावाचे विविध जाती प्रवर्गातील नागरिक आहेत़ आपण जर आडनावावरून जात ठरवायला लागलो तर या सर्व्हेक्षणात ओबीसी प्रवर्गाची खरी लोकसंख्या मिळणार नाही. त्यामुळे यात लवकरच सुधारणा करण्यात येईल, असे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्षेप नोंदविला असून ही पद्धत सदोष असल्याचे म्हटले आहे़. आडनावावरून ओबीसींची (OBC) जनगणना केली जात असेल तर यात ओबीसींची खरी लोकसंख्या माहीत पडणार नाही़. ती संख्या कमी जास्त होऊ शकते. परिणामी ओबीसींचे नुकसान होईल, अशी आमचीही भावना असल्याचे वडेट्टीवार म्हणाले़. यासंदर्भात आपली काल राज्याच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात गठित करण्यात आलेल्या समर्पित आयोगाचे अध्यक्ष बांठिया यांच्याशी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याशीही चर्चा झाली आहे. आज सकाळीच ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांशीही याविषयी चर्चा करण्यात आली असल्याचे मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

या विषयाकडे आपले संपूर्णपणे बारीक लक्ष असल्याचे आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही आश्वस्त करीत असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. फडणवीस यासंदर्भात आज जे बोलले, त्यात काही अंशी सत्यता आहे, त्यांच्या मुद्यांचे मी समर्थनही करतो़. आमच्या लक्षात ही बाब आल्यामुळे आम्हीही ‘अलर्ट’ आहोत. त्यामुळे आता यासंदर्भात डेटा गोळा करताना आडनाव, त्या आडनावाच्या व्यक्ती कुठल्या जातीची व कुठल्या कॅटॅगिरीत येतात, ही माहितीदेखील आता त्याठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीकडून घेण्यात येणार आहे. डेटा तयार करताना आडनावासमोर त्या व्यक्तीची जातही नमूद करण्यात येणार आहे. अशी नोंद केल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो. एक गाव साधारणतः: ६०० ते ७०० लोकसंख्येचे आहे. आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली तर तीन-चार दिवसांत योग्य डेटा हातात येईल व यात कुठेही गडबड होणार नाही, अशी विनंती मुख्यमंत्र्यांसह, आयोगाचे अध्यक्ष व ग्रामविकास विभागाच्या सचिवांना करण्यात आली असल्याचे वडेट्टीवार यावेळी म्हणाले. ओबीसींचे अहित मी कधीही सहन करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारचा निधी हा कुणाच्याही बापाचा नसतो..

कुण्यातरी माजी मंत्र्यांनी म्हटले की, निधी हा काय त्यांच्या बापाचा आहे का? ही बोलण्याची पद्धत नसते. ते मंत्री असताना निधी त्यांच्या बापाचा होता का? असा सवाल ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. सर्व आमदारांना निधी देता देता कधी कधी स्वतःच्याच मतदारसंघासाठी निधी उरत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Vijay Wadettiwar
Video: जात, पात, धर्म बघू नये; विजय वडेट्टीवार

स्ट्रॅटिजीमध्ये फडणवीस सरस ठरले..

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस सरस ठरले, हे मान्य केले पाहिजे आणि मोठ्या मनाने आम्ही ते मान्य करतो. निवडणुकीसाठी ईडीचा वापर हा आमच्याही आकलनाबाहेरचा विषय आहे. १००० कोटीच्या वरील विषय असला तर ईडीचा वापर व्हायचा. आता तो १०० कोटींवर आणि २ कोटींवरही आला आहे. भविष्यात तो २५ हजारांवरही आला तर नवल वाटायला नको, असे वडेट्टीवार म्हणाले.

आता चावाचावीचा खेळ बंद केला पाहिजे..

कुणाचेही सरकार नेहमीसाठी नसते. आपले नाही आले म्हणून आक्रस्ताळेपणा करू नये. थांबावं, वाट बघावी. कुणी आपल्याला चावले म्हणून आपण त्याला चावलेच पाहिजे का? जो चावतो त्यालाही ते भोगावे लागते. त्यामुळे राज्यात सुरू असलेला चावाचावीचा खेळ बंद करावा, असा टोला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com