
अकोला : शिवसेना (Shivsena) आणि युवा सेनेत फूट पडल्यानंतरही युवा सेनेच्या जिल्ह्यातील नवीन नियुक्तीचा तिढा कायम आहे. त्यामुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुंबईत (Mumbai) झालेल्या बैठकीनंतर नेत्यांनी दोन-तीन दिवसांत नवीन नियुक्त्या जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ५० आमदारांना सोबत घेत भाजपच्या (BJP) पाठिंब्याने सरकार स्थापन केले. जिल्ह्यातही त्यांच्या गटाकडून शिवसेनेच्या अनेक आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी प्रवेश केला असून, त्यांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्यात. त्यात शिवसेना, युवा सेनेतून (Yuva Sena) शिंदे गटात गेलेल्या अनेक नेत्यांचा सहभाग आहे. त्यापूर्वी मंगळवारी अकोला (Akola) जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली होती. ही बैठक युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, अमेय घोले, साईनाथ दुर्गे, विशाल केचे, सागर देशमुख यांनी घेतली.
या बैठकीत जिल्ह्यातून राहुल कराळे, दीपक बोचरे, अभय खुमकर, नितीन मिश्रा, कुणाल पिंजरकर, आस्तिक चव्हाण, अजय लेलेकर, शाम बहुरुपे, सोनू वाटमारे, महेश मोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शिंदे गटात गेलेल्या युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या जागेवर कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असे या बैठकीत जाहीर करण्यात आले होते. मात्र, शिंदे गटात गेलेल्यांवर कारवाई तर झाली नाही, पण नवीन नियुक्त्याही करण्यात आल्या नसल्याने आता अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढत आहे.
युवा सेनेचे जिल्हाध्यक्षपदच रिक्त..
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, योगेश बुंदेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले. त्यांना शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदी नियुक्तीही मिळाली आहे. त्यामुळे युवा सेनेतील अनेक पदे रिक्त झाली आहेत. या रिक्त जागांवर तातडीने संधी मिळेल, अशी अपेक्षा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आठवडा उलटल्यानंतरही नेत्यांनी पक्षापेक्षा केवळ वैयक्तिक राजकीय कारकिर्दीवरच लक्ष केंद्रीत केल्याने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त होत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.