
नागपूर : भाजपचा अनेक अतिरेक्यांसोबत संबंध आहे. त्यांचा वापर राजकीय ध्रुवीकरणासाठी केला जात आहे. हाच भाजपचा (BJP) खरा चेहरा असून राष्ट्रवादाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय प्रवक्ते आदील बोपराई यांनी आज येथे परिषदेत केला. यावेळी त्यांनी काही घटना आणि भाजपच नेत्यांचे अतिरेक्यांसोबत असलेल्या संबंधांचीही माहिती दिली.
उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या हत्येत सहभागी असलेला मोहम्मद रियाज अत्तारी हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे उघडकीस आले आहे. भाजपच्या अनेक कार्यक्रमांत बड्या नेत्यांसोबत तो वावरत होता. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना पकडले होते. त्यांपैकी एक तालिब हुसैन शाह भाजपचा पदाधिकारी आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मास्टरमाइंड इरफान खान हा तर खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) आणि त्यांचे पती आमदार रवि राणा (Ravi Rana) यांचा कार्यकर्ता आहे.
२०२० जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांना शस्त्राचा पुरवठा करणारा तारिक अहमद मीर हासुद्धा भाजपचा कार्यकर्ता होता. तो सरपंचसुद्धा होता. २०१७ मध्ये मध्यप्रदेशात आयएसआय या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेला मदत करणाऱ्या ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांपैकी ध्रुव सक्सेना हा भाजपच्या आयटी सेलचा सदस्य होता. टेरर फंडिंगचा आरोपी असलेला बलाराम सिंग हा बजरंग दलाचा तर अतिरेक्यांना शस्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झालेला निरंजन होजाई हासुद्धा भाजपचा कार्यकर्ता आहे.
एवढेच नव्हे तर कुख्यात दहशतवादी अजहर मसूद याचा शिष्य असलेल्या मोहम्मद फारुक खान यास भाजपने श्रीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३३ मधून उमेदवारी दिली होती. मात्र भाजपने आजवर याचे उत्तर कधीच दिले नाही. याबाबत विचारणा केली असता आम्हाला देशद्रोही ठरवले जाते, असेही आदील बोपराई यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार विकास ठाकरे, संदेश सिंगलकर, दिनेश बानाबाकोडे, संजय महाकाळकर आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.