रविकांत तुपकर यांच्या वाहनाला दुचाकीची धडक…

चिखलीच्या डॉ. मेहेंद्रे Dr. Mehendre यांच्या दवाखान्यात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर असल्यामुळे डॉ. मेहेंद्रे यांनी त्याला बुलडाण्याला Buldana नेण्याचा सल्ला दिला.
रविकांत तुपकर यांच्या वाहनाला दुचाकीची धडक…
Ravikant Tupkar's CarSarkarnama

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या वाहनाला दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला, तर मागे बसलेल्याला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुटल्यानंतर ते रुग्णालयात दाखल होते. त्यांचे प्रकृती पूर्णपणे ठीक झालेली नाही. पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तुपकरांना त्यांनी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात बैठकीसाठी मुंबईला बोलावले आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे बुलडाणा ते मुंबई हा प्रवास त्यांनी दोन टप्प्यात करण्याचे ठरविले. काल निघून नगर किंवा औरंगाबादला एक मुक्काम करायचा आणि त्यानंतर आज सकाळी तेथून मुंबईसाठी निघायचे, असे त्यांचे नियोजन होते. पण काल चिखलीनजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

चिखलीपासून जवळच असलेल्या बेराळा फाट्यावर येवल्याकडून एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. एका ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात त्याने तुपकरांच्या वाहनाला जबर धडक दिली. दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये दुचाकी चालक तुषार परिहार हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तर मागे बसलेला गजानन सोळंकी किरकोळ जखमी झाला. रविकांत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच दोन्ही जखमींना गाडीत टाकले आणि चिखलीच्या डॉ. मेहेंद्रे यांच्या दवाखान्यात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर असल्यामुळे डॉ. मेहेंद्रे यांनी त्याला बुलडाण्याला नेण्याचा सल्ला दिला.

तुषारला चांगले उपचार मिळावे म्हणून रविकांत तुपकर यांनी त्याला तातडीने औरंगाबादला नेले. तेथे सिगमा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तुपकर आणि त्यांचे सहकारी रात्रभर तेथेच थांबलेले होते. तुषारची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही जखमींची रुग्णालयात व्यवस्था लावून तुपकर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले.

Ravikant Tupkar's Car
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात

अजित पवारांसोबत बैठक..

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस-सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी तुपकरांनी अन्नत्याग सत्याग्रह केला होता. तीन दिवसांनंतर राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले. पण आंदोलन सुटल्यानंतर ते रुग्णालयात दाखल असल्यामुळे लगेच जाऊ शकले नव्हते. आज अजित पवार यांच्यासोबत तुपकरांची बैठक होणार, असल्याची माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in