
Nagpur Teachers Constituency Election : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत होतो. कार्यकर्ते उत्सुक होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलावून घेतले होते आणि ताकदीने लढा, असे सांगितले होते. त्यानंतर मुंबईत काय झाले माहिती नाही, आज माघार घ्यायला लावली, अशी व्यथा शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी आज व्यक्त केली.
गंगाधर नाकाडे यांनी निवडणुकीतून (Election) माघार घेतली असली तरी आपण रिंगणात असतो तर निश्चितपणे निवडून आलो असतो, असा दावा केला. महाविकास आघाडीने नागपूरची (Nagpur) जागा शिवसेनेसाठी (Shivsena) सोडली होती. सेनेने गंगाधर नाकाडे यांना उमेदवारी दिली होती. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले होते. संपूर्ण ताकदीने लढायचे असल्याचे सांगितले होते. सोबतच अनेक नेत्यांनाही लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २१ जानेवारीला नागपूरमध्ये बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीला पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत हेसुद्धा येणार होते. रविवारीसुद्धा नाकाडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्यांच्या दोन सभांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. असे असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला. उमेदवारी मागे घेतल्यानंतर नाकाडे म्हणाले, आपण सुमारे ९८०० मतदारांची नोंदणी केली होती. पाच वर्षांपासून तयारी करीत होतो. मतदारांसोबतच्या संपर्काची एक फेरी आटोपली होती.
मुंबईत काय घडले, हे ठाऊक नाही. आमचे नेते ज. मो. अभ्यंकर यांचा कॉल आला. त्यानुसार उमेदवारी मागे घेतली. पक्षानेच उमेदवारी दिली होती. त्यांनीच माघार घ्यायला लावली. यामुळे नाराजी नाही, असे नाकाडे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती. कोणाचे काम करणार, की नाही करणार याबाबत छेडले असता, ते म्हणाले पक्ष जो आदेश देईल त्या उमेदवाराचे काम करू. शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. ते स्वाभाविक आहे. त्यांची समजूत काढावी लागेल, असेही नाकाडे यांनी सांगितले.
उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामा..
नाकाडे यांना माघार घ्यायला लावल्याने शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी शिवसैनिकांचा कोणी वाली नाही, असे सांगून पदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.