तुपकर कडाडले; म्हणाले, एका टप्प्यात एफआरपी ‘त्यांच्या’ बापालाही द्यावी लागेल...

माझ्या राजाने काय मिळवले असेल तर इथे जमलेली बळीराजांची ही फौज. ही फौज राजू शेट्टींची Raju Shetti संपत्ती आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन तुकड्यांत एफआरपी देण्याची भाषा करणाऱ्या, सरकारमध्ये असलेल्या लोकांनी ही भाषा सोडावी. कारण त्यांच्या बापालाही एकरकमी एफआरपी द्यावी लागेल. तो आमचा अधिकारच आहे. एफआरपीपेक्षा जास्त किती देता, हे तुम्ही सांगा. कारण त्यासाठीच आजची ही परिषद आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आज म्हणाले.

जयसिंगपूर येथे ऊस परिषदेमध्ये ते शेतकऱ्यांना संबोधित करीत होते. मंचावर संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि इतर पदाधिकारी होते. तुपकर म्हणाले की, आपल्याला आधी वाटले होते की, महाविकास आघाडी आपल्या बाजूने आहे. पण तो आपला भ्रम ठरला. लोक आपल्याला म्हणतात, की तुम्ही महाविकास आघाडीत आहात. पण आपण आहे काय अन् नाही काय? आपले आहेच काय तेथे, असा प्रश्‍न तुपकर यांनी केला. राज्य असो किंवा केंद्र सरकार, आता सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि येथे न्याय कुणी देत नाही, तर तो हिसकावून घ्यावा लागतो.

कुणी गाड्या, घोड्या घेतल्या तर कुणी बंगले बांधले. माझ्या राजाने काय मिळवले असेल तर इथे जमलेली बळीराजांची ही फौज. ही फौज राजू शेट्टींची संपत्ती आहे. ३०० रुपये ऊसाचा भाव होता, तो आता ३२०० - ३३०० रुपये आहे. यासाठी तुम्हाला आम्हाला २० वर्ष संघर्ष करावा लागला. एफआरपीचा कायदा खऱ्या अर्थाने राजू शेट्टी यांच्यामुळे झाला. हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी पुंडलिक कोकाटे आणि चंद्रकांत मळावने यांना पोलिस गोळीबारात मरावे लागले. हा कायदा येवढ्या सोपासोपी झाला नाही. अनेक आंदोलनामध्ये आपली लोक शहीद झालेली आहेत, अनेकांना लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत. तर अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे. अनेकांना रक्त या कायद्यासाठी सांडले आहे.

महाविकास आघाडी सरकारही केंद्रात सहभागी झाले कारण ते साखर कारखानदारांच्या बाजूने गेले. राजू शेट्टी यांनी दख्खनच्या राजापासून ते महाराष्ट्रातील सगळ्या शक्तिपीठांची आराधना केली. अख्खा महाराष्ट्र फिरले त्यानंतर कोठे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्र दिले, की आम्ही एफआरपीचे तुकडे करणार नाही. एफआरपीची तीन तुकड्यांचा निर्णय नोटाबंदीच्या निर्णयासारखा कोणत्याही क्षणी धडकू शकतो, ही चाहूल राजू शेट्टी यांना लागली, त्यामुळे ऊभ्या महाराष्ट्रातील शेतकरी या एफआरपीच्या विरोधात एकवटला आणि सरकारच्या विरोधात उभा झाला. साखरेचा दर आता ४ हजारांवर जाणार आहे. त्यामुळे एफआरपीपेक्षा ३०० ते ४०० रुपये जास्त घेणे, हा आपला अधिकार आहे, असेही तुपकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

Ravikant Tupkar
आधी समजावून सांगा, नाही तर ‘त्यांच्या’ कानाखाली वाजवा, तुपकर ठाम !

दोन वर्षांत तुमच्याकडे महापूर आला, तुमचा ऊस वाहून गेला. इतर पिकेही वाहून गेली आणि सरकारने तुम्हाला सरकारने मदत केली, ती किती तर १३५ रुपये प्रतिगुंठा. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आहात अन् त्या मदतीला तुम्ही हातही लावणार नाही. सरकारला तुमच्याकडे बघायलाही वेळ नाही. आमच्याकडील (विदर्भातील) स्थिती तर तुमच्यापेक्षाही वाईट आहे. सोयाबीनच्या शेतांत तर कंबरभर पाणी साचले होते. सर्व पीक वाया गेले आहे. तरीही सरकार मदतीसाठी पुढे यायला तयार नाही, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com