आजचा वाढदिवस : आमदार सुधीर मुनगंटीवार (माजी मंत्री, भाजप नेते)

सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे शब्दप्रभू, संवेदनशील, तेवढेच आक्रमक अन् विदर्भातील महत्वाचा चेहरा !
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री असतानाच नव्हे तर आमदार असताना आणि त्यापूर्वी म्हणजे विद्यार्थिदशेत एक कार्यकर्ता म्हणून आपल्या कामाची छाप राज्यावर पाडली. ते उत्कृष्ट संसदपटू तर आहेतच पण राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा विदर्भातील एक महत्वाचा चेहरा आहेत. जन्म घेतल्यानंतर एका टोकावरून आयुष्याची सुरुवात करून दुसऱ्या टोकावर ते संपणे, येवढेच ज्यांचे उद्दिष्ट नसते. तर ज्या समाजात आपण जन्मलो, त्या समाजाचेही काही देणे लागतो, या भावनेने काम करणारी जी लोक आहेत, त्यांमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार अग्रस्थानी आहेत.

राज्याचे वनमंत्री व अर्थमंत्री असताना त्यांनी आपल्या कार्याची अमिट अशी छाप राज्यातील जनतेच्या मनावर उमटवली. कुणीतरी आखून दिलेल्या चाकोरीतून काम करणे त्यांना जमलेच नाही. नेहमीच त्यांनी वेगळी वाट निवडली आहे. लोकहितकारी उपक्रमामध्ये लोकांनाच सहभागी करून घेतल्यास काय परिणाम साधले जातात, हे त्यांनी वनमंत्री असताना ३३ कोटी वृक्ष लागवडीतून दाखवून दिले. राज्य सरकारच्या (State Goverment) सर्व विभागांतील लोकांना आणि शाळा महाविद्यालयांपासून ते सर्वसामान्य माणूस त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाला आणि ती योजना पूर्णत्वास नेण्यात महत्वाचा वाटा उचलला. अर्थमंत्री म्हणून काम करताना उत्कृष्ट आणि लोकप्रिय अर्थसंकल्प मांडण्याची ख्याती असलेले मंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला. अगदी देशाचा अर्थसंकल्प मांडतानासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुधीरभाऊंना (Sudhir Mungantiwar) दिल्लीला (Delhi) पाचारण केले होते, असे त्यांचे निकटतम मित्र सांगतात. त्यामुळे एखाद्या खात्याचे काम करताना त्यात ‘मास्टरी’ कशी मिळवावी, हे सुधीरभाऊंकडून शिकण्यासारखे आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार अभ्यासू आहेत, शब्दप्रभू आणि संवेदनशील मनाचे आहेत, लोकांचे दुःख बघून त्यांचे मन द्रवते. पण त्यांचा आक्रमकपणा अनेकांची घाबरगुंडी उडवतो. याचा अनुभव नुकताच पूरपरिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना घेतला. वेकोलिच्या (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) गलथानपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतांचे नुकसान झाले, लोक बेघर झाले अन् त्यांच्या खाण्यापिण्याचेही वांदे झाले. अशा वेळी त्यांनी वेकोलिच्या महाप्रबंधकांना चांगलेच खडसावले आणि तात्काळ लोकांची व्यवस्था करायला लावली. येवढेच नाही, तर त्यांच्या कार्यकर्त्यांवरही विविध जबाबदाऱ्या सोपवून पूरपरिस्थितीत बाधितांची व्यवस्था केली.

आमदार मुनगंटीवारांचा मंत्रिपदाचा अनुभव दांडगा आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून दोन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळताना मंत्रिपदाची छाप त्यांनी राज्यातील जनतेच्या मनावर उमटवली. राज्याचा कारभार करताना विदर्भ आणि मराठवाड्यावर त्यांनी कधीही अन्याय होऊ दिला नाही. राजकारणात विदर्भातील ते एक मोठा चेहरा आहेत. प्रशासनावर त्यांनी चांगली पकड निर्माण केली आणि ती आजही कायम आहे. त्यांच्या काळातील काही अधिकारी निवृत्त झाले. पण आजही अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. कधी कधी ते आक्रमक होतात, त्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडते. पण नंतर अशा मंडळींना सांभाळून घेण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे राजकारण करीत असतानाही जवळपास सर्वच राजकीय पक्षांतील लोकांशी त्यांची मैत्री राजकारणापलीकडील आहे.

Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार म्हणाले; संजय राऊत बरोबर म्हणताहेत, आता सत्तांतर कधीही होऊ शकते !

चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थी चळवळीतून सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व समोर आले. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रारंभीच्या राजकीय वाटचालीत अपयशाची चवही चाखली आहे. लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर 1995 मध्ये ते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा आता पूर्ण प्रभाव आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर आता मूल मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. भाजयुमोचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही सुधीर मुनगंटीवार यांनी जबाबदारी पार पाडली आहे. राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळत असताना राज्यातील कर्तबगार व प्रमुख मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश केला गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in