राज्यसभा-विधानपरिषदेत अर्धे मतही महत्वाचे; विलासराव देशमुखांचे उदाहरण आजही ताजे

१९९६ साली एकाच निवडणुकीत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा पराभव झाला. त्यानंतर सर्व निवडणुकांमध्ये ते विजयी होत गेले.
Vilasrao Deshmukh
Vilasrao DeshmukhSarakrnama

नागपूर : राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण दिवसागणिक गरम होत आहे. या निवडणुकांमध्ये अर्धे मत देखील महत्वाचे असल्याने सर्व राजकीय पक्ष अपक्षांना डोळ्यांसमोर ठेवून गणिते मांडण्यात गुंतलेले दिसतात. राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याच अर्ध्या मतामुळे आज माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण काढली जात आहे.

विलासरावांची आठवण काढण्यासाठी कारणही तसेच आहे. १९९६ साली विधानपरिषदेच्या निवडणुकीत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) शिवसेना (Shivsena) पुरस्कृत उमेदवार होते आणि केवळ अर्ध्या मताने त्यांचा पराभव झाला होता. त्याकाळी ती निवडणूक चांगलीच गाजली होती. याचवेळी लालसिंह राजपूत नावाचे उमेदवारही ही निवडणूक लढले होते, अशी माहिती विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी ‘सरकारनामा’ला दिली. विधानपरिषदेच्या आजपर्यंत गाजलेल्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक होती.

राज्यसभा किंवा विधानपरिषद या निवडणुका रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट १९५१ व कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल १९६१ च्या नियमान्वये घेतल्या जातात. निवडणुकीत मतांचा कोटा व पसंतीक्रम निश्चित करून दिला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु तेवढी मते न मिळाल्यास सर्वच उमेदवारांची दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पसंतीची मते मोजली जातात. चौथ्या पसंतीची मते मोजण्याची वेळ यापूर्वी केवळ विलासराव देशमुख यांच्यावेळी आली होती.

१९९५ च्या विधानपरिषद निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा लातूरमधून शिवाजीराव कव्हेकर यांच्या हातून पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला हरलेल्यांना विधान परिषदेला उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतला. मात्र तत्कालिन नेते शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव पुढे केले. परिणामी विलासराव देशमुख यांनी शिवसेनेच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलासराव देशमुख यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देखील दिली. पण त्यावर विलासराव देशमुख म्हणाले, माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढाल? त्यांचे हे वाक्य बरेच गाजले.

पुढे विधानसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत विलासराव महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील बनले. त्यादिवशी त्यांनी अनंत कळसे यांना जाऊन मिठी मारली व म्हणाले, ‘कळसे, तुम्ही काटेकोर मतमोजणी केल्यामुळे माझा अर्ध्या मताने पराभव झाला. निवडून आलो असतो, तर शिवसेनेचा आमदार म्हणून वावरलो असतो. पराभव झाल्यानेच मी परत काँग्रेसमध्ये सक्रिय झालो व आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो.’

Vilasrao Deshmukh
विलासराव आज असते तर, या भाजप आमदाराच्या प्रश्नावर धीरज देशमुख म्हणाले...

महाराष्ट्रातील २८८ सदस्यांपैकी २८५ सदस्यच यावेळी मतदान करण्याची शक्यता आहे. कारण अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत आणि शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त झाली आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियमांनुसार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आमदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. एखादे प्रकरण जरी न्यायप्रविष्ट असेल, तरीही अशा सदस्यांना मतदान करता येत नाही. न्यायालयाने परवानगी दिल्यासच अशा सदस्यांना मतदान करता येते. पण असे क्वचितच घडल्याचे ऐकीवात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com