
नागपूर : शनिवार आणि रविवारी नागपुरात सर्वच राजकीय पक्षांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित आहेत. अनेक बडे नेते दोन दिवस येथे असणार आहेत. त्यातच राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणाला राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्युत्तर देणार आहे. या सर्व कार्यक्रमांमुळे माध्यम प्रतिनिधींसह पोलिसांनाही तारेवरच कसरत करावी लागणार आहे. रविवारी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचा स्वागत समारंभ आहे. त्यासाठीही राज्यासह देशभरातली बडे नेते नागपुरात असणार आहेत.
सर्वच राजकीय पक्षांच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नागपूरमध्ये (Nagpur) प्रचंड वर्दळीचे राहणार आहे. एकीकडे काँग्रेसचा (Congress) संकल्प मेळावा, दुसरीकडे सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर, खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप आणि राणा दाम्पत्याच्या हनुमानचालिसा पठणाला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या (NCP) महाआरतीच्या आयोजनाने कार्यकर्त्यांची सोबतच प्रसिद्धी माध्यमांची चांगलीच दमछाक होणार आहे. दुसरीकडे सर्वांचा बंदोबस्त राखताना पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शनिवारी आणि रविवारी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्यावतीने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या शिबिरात देशभरातील काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत. यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह केंद्रातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त काँग्रेसने रविवारी सुरेश भट सभागृहात नवसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
हनुमान चालिसाविरुद्ध महाआरती..
राणा दाम्पत्य शनिवारी एक वाजता नागपूर विमानतळावर दाखल होते आहे. त्यांच्या स्वागतासाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने स्कूटर रॅली काढण्यात येणार आहे. रामनगर येथील हनुमान मंदिरात त्यांच्यातर्फे महाआरती आणि हनुमान चालिसाचे पठण केले जाणार आहे. राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार हेसुद्धा महाआरती करणार आहे. त्यामुळे दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमशान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कपिल देव व अरमान मलिक..
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा शनिवारी समारोप होत आहे. १९८३सालच्या वर्ल्ड कप विजेता संघाचे हिरो व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव या कार्यक्रमाला येत आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आहे. यशवंत स्टेडियमवर होणाऱ्या या समारोपाला अरमान मलिक यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाची जोड देण्यात आली आहे. अनेकांना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या लग्नालाही हजेरी लावायची आहे.
ओबीसी आयोगाची सुनावणी..
बांठिया अध्यक्ष असलेले समर्पित ओबीसी आयोगाचे पथक शनिवारीच नागपूरला येत आहे. त्यामुळे विविध ओबीसी संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचाही धावपळ सुरू आहे. ओबीसी आयोगाच्या अहवालावर ओबीसींचे राजकीय आरक्षण अवलंबून असल्याने सुनावणीकडे दुर्लक्ष करून कोणालाच चालणार नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.