अशी ही खाबूगिरी : चेक पोस्ट पार करण्यासाठी ढाब्यावरून घ्यावा लागतो पास...

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील देवरीच्या चेक पोस्टबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. देवरीमधील एक ढाबा संपूर्ण चेकपोस्ट चालवत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
Deori Check post of Gondia District
Deori Check post of Gondia DistrictSarkarnama

भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील मुंबई (Mumbai) - कोलकाता (Kolkata) महामार्गावर असलेल्या देवरी येथील परिवहन विभागाच्या (RTO) सीमा तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय वाहने राज्याची सीमा ओलांडू शकत नाही. येथून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी एक पास तयार करण्यात आली आहे. ही पास देवरी परिसरातील एका ढाब्यावरून वाहनधारकांना उपलब्ध करून दिली जाते आणि याच ढाब्यावरून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे.

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील देवरीच्या चेक पोस्टबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. देवरीमधील एक ढाबा संपूर्ण चेकपोस्ट चालवत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ढाब्यावर नियुक्त एका एजंटद्वारे वाहनधारकांना पास स्वरूपी टोकन मिळते आणि ही पास दाखविली की सहजरीत्या देवरिचा चेक पोस्ट पार करता येतो. वाहनचालकांजवळ ही पास असली तर त्यांना देवरी चेक पोस्टवर अडविले जात नाही. विशेष म्हणजे या पासवर गाडीचा नंबर आणि संबंधित गाडी मालकाचा मोबाईल नंबर लिहिलेला असतो. ही पास मिळवण्यासाठी एक विशिष्ट रक्कम ठरलेली आहे आणि ढाबा मालकाला दर महिन्याला ती रक्कम पुरवून संबंधित पास प्राप्त करता येते.

ढाबा मालकाचे देवरीच्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याने त्यांना सहजासहजी पासेस उपलब्ध होतात. या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. लाखाहून अधिक ट्रक मालक संबंधित ढाबा मालकाच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे या कामासाठी जवळपास २५ ते ३० लोकांची एजंट म्हणून नियुक्ती केली गेली आहे. या एजंटांमार्फत संपूर्ण टोकन पासचा व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे या ढाबा मालकाची चौकशी केल्यास देवरी चेक पोस्टवरील भ्रष्टाचार उघडकीस येईल, असेही सूत्रांनी सांगितले.

देवरी चेक पोस्ट मुंबई- कोलकाता जाण्यासाठी महत्वाच्या मार्गावर असल्याने दररोज लाखोंच्या संख्येने वाहने या मार्गावरून वाहने जातात. मात्र महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जायचे असेल तर अधिकाऱ्यांचा खिसा गरम केल्याशिवाय जाता अथवा येता येत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुमच्या वाहनाचे सर्व कागदपत्र बरोबर असले तरी तुमचे वाहन का थांबविले गेले. तर तुम्ही जोपर्यंत परिवहन अधिकाऱ्यांना ५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत चिरीमिरी देत नाही, तो पर्यंत तुमचे वाहन पास होणार नाही. येथील अधिकाऱ्यांनी खासगी लोकांच्या माध्यमातून येथे समांतर यंत्रणा उभी केली आहे आणि त्या माध्यमातून शासनाला जूना लावण्याचे काम बिनबोभाटपणे केले जात आहे.

Deori Check post of Gondia District
आरटीओचा देवरी चेकपोस्ट ठरला लुबाडणुकीचा अड्डा, परिवहन मंत्री लक्ष देतील का?

राज्यातील सरकार, महाविकास आघाडी सरकार नसून हे महावसुली सरकार आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यातूनच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. देवरी येथील चेक पोस्टवर ट्रक चालक, मालकांकडून ज्या पद्धतीने अवैध वसुली सुरू आहे. त्यातून विरोधकांच्या आरोपाला बळ मिळत असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे आता परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालून या चेकपोस्टवरील भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com