RTO : पुणे-नागपूरसाठी तीन पट जास्त भाडे, आरटीओचा तर सहभाग नाही ना ?

ट्रॅव्हल्सवर (Travels) कारवाई करण्याचे अधिकार आरटीओला (RTO) आहेत. पण प्रवाशांची होणारी लूट बघूनही काही कारवाई केली जात नाही, याबद्दल प्रवाशांमध्ये चीड व्यक्त केली जात आहे.
RTO
RTOSarkarnama

नागपूर : दसऱ्यानंतर दिवाळी संपेपर्यंत पुणे (Pune) -नागपूर प्रवासासाठी तिपटीपेक्षा जास्त भाडे ट्रॅव्हल्सचालकांकडून आकारले जात आहे. येवढे असूनही अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सचालक त्याची कुठलीही जबाबदारी घेत नाहीत. त्यातच नाशिकच्या अपघाताची घटना ताजी आहे. पण यामध्ये राज्याचा परिवहन विभाग (आरटीओ) करतो काय, असा प्रश्‍न जनसामान्यांना पडल्यावाचून राहात नाही. दरवर्षी ऐन दिवाळीच्या सणालाच दरवाढ होते कशी, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.

ट्रॅव्हल्सवर (Travels) कारवाई करण्याचे अधिकार आरटीओला (RTO) आहेत. पण प्रवाशांची होणारी लूट बघूनही काही कारवाई केली जात नाही, याबद्दल प्रवाशांमध्ये चीड व्यक्त केली जात आहे. मनमानी भाडे आकारणीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नाशिक (Nasik) येथे झालेल्या खासगी बसच्या अपघातानंतर नागपूरमध्ये (Nagpur) केवळ देखावा म्हणून थातूरमातूर कारवाई करण्यात आली. अग्निशमन यंत्रणा नसणे, बसचा आपत्कालीन दरवाजा न उघडणे, अशा समस्या असतानाही नागपुरातून बिनधास्त ट्रॅव्हल्स धावत आहेत. अशा गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट कसे मिळते? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नागपूर-पुणेसाठी मोजा चार हजार..

दिवाळीत गर्दीमुळे मनमानी भाडे आकारून खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची लूट चालविली आहे. सुमारे हजार रुपये असलेले पुण्याचे भाडे साडेचार हजार रुपयांवर गेले आहे. रेल्वेचे वेटिंग आणि एसटीची गर्दी पाहून प्रवासी ट्रॅव्हल्सकडे नाइलाजाने वळतात. या लूटमारीकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवाशांकडून होऊ लागला आहे.

एसटीच्या ५० टक्के अधिक भाडे वसूल करण्याचा अधिकार ट्रॅव्हल्सवाल्यांना आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचालक आधीपासूनच हे भाडे वसूल करीत आहेत. मात्र, सणासुदीच्या काळात मनमानी भाडे आकारून ते प्रवाशांना लुटत आहेत. रक्षाबंधन आणि दसऱ्यानंतर भाऊबिजेपर्यंत भाडेवाढ कायम राहणार असल्याचे खासगी बस चालकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे सुमारे हजार रुपये असलेले नागपूर-पुणे ट्रॅव्हल्सचे भाडे चार हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे. दिवाळीसाठी नोकरदार वर्ग, विद्यार्थी मुळ गावी जातात. याची संख्या नागपूर, पुण्यात जास्त आहे. अशावेळी ट्रॅव्हल्स चालक सणासुदीचा गैरफायदा घेत आहेत. जे ग्राहक उत्पन्नाचे साधन आहेत, त्यांचीच अडचणीच्या काळात लूटमार सुरू आहे. या घृणास्पद प्रकारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

RTO
पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाकडून महिलेवर बलात्कार

या मार्गांवर जास्त गर्दी..

पुणे सोबतच औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, शेगाव, अकोला, जालना, हैदराबाद, अलाहाबाद, सारणी, इंदूर, भोपाळ, रायपूर, जबलपूरला जाण्यासाठी गर्दी होत आहे. गणेशपेठ, बैद्यनाथ चौक, सीए रोड, धंतोली, छत्रपती चौक, एमपी बस स्टँड येथे बुकिंग कार्यालयासमोर खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसत आहे. याकरिता सामान्य दिवशी ५०० ते १२०० रुपयांपर्यंत आकारण्यात येत असलेले भाडे दिवाळीत २५०० ते ४५०० पर्यंत आकारले जात आहे.

सामान्य प्रवासी जुनेच दर समजून खासगीकडे जात आहेत. मात्र, त्यांच्याकडून तीनपट भाडे आकारले जात आहे. ही लूट थांबविण्यासाठी खासगी बसच्या भाडेवाढीवर अंकुश लावण्याची गरज आहे. मात्र, कारवाई होताना दिसत नसल्याने खासगी बसचालकांची मुजोरी वाढली आहे.

- बसंत कुमार शुक्ला, सचिव- भारतीय यात्री केंद्र.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in