Bhavana Gawali : भावनाताईंचे देऊळ पाण्यात? भूतकाळातील वाद अन् ठाकरेंची सोडलेली साथ भोवणार...? बंजारा कार्डवर ठरणार गेम…

Washim-Yavatmal : महाविकास आघाडी आणि भाजपचे हे आहेत संभाव्या उमेदवार
Bhavana Gawali News
Bhavana Gawali NewsSarkarnama

Washim-Yavatmal Lok Sabha Constituency : वाशीम-यवतमाळ (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची ही पाचवी टर्म आहे. सतत पाच वेळा येथून खासदार राहण्याचा विक्रम त्यांनी केला. मात्र, २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या सहाव्या टर्ममध्ये त्यांचे देऊळ पाण्यात दिसत आहे. याला कारणेही तशीच आहेत. मुख्य कारण म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यामुळे मूळ शिवसैनिक त्यांच्यावर चिडून आहेत.

ईडीची (ED) कारवाई, भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासोबत झालेला वाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्ते बांधकाम ठेकेदारासोबत घातलेला वाद, मतदारसंघात संपर्क न ठेवणे, विकासकामांची बोंब या आणि अशा अन्य काही कारणांनी सामान्य मतदारही त्यांच्यापासून दुरावला असल्याची चर्चा आहे. भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासोबत त्यांचा मोठा वाद आहे. दुसरीकडे यवतमाळ-वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत त्यांचे 'सख्य' सर्वश्रुत आहे. अगदी विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. राठोड त्यांना आणि भावनाताई राठोडांना कधीही पुढे जाऊ देणार नाहीत, असे चित्र आहे. या लढाईत संजय राठोड आज तरी वरचढ असल्याचं दिसतंय.

Bhavana Gawali News
Ravikant Tupkar News : ...तर रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधवांना चितपट करतील; आघाडी वज्रमुठ आवळणार?

भावना गवळी सद्यःस्थितीत एकनाथ शिंदे गटात आहेत. पण लोकसभेची ही जागा भाजप त्यांच्यासाठी सोडेल, अशी काहीही शक्यता नाही. उमेदवारीसाठी भावना गवळी (Bhavana Gawali) भाजपमध्ये गेल्या तरी तेथे त्यांनी आधीच शत्रू तयार करून ठेवलेले आहेत. जाहीर कार्यक्रमांमध्ये कितीही सोबत दिसत असले तरी भाजपवाले त्यांना पसंत करीत नाहीत, हे वास्तव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला लुडबुड करू देईल, असे वाटत नाही. बदल्यात विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे ऐकले जाऊ शकते. पण या निवडणुकीत तसे होणार नाही, हे स्पष्ट दिसतंय.

भाजप-शिवसेना (Shivsena) युतीमध्ये हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे आणि पुंडलिकराव गवळी यांच्यानंतर भावना गवळी सतत खासदार म्हणून आजतागायत निवडून आल्या आहेत. कॉंग्रेसने येथे शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे यांच्या रूपाने प्रयत्न करून बघितले. पण कॉंग्रेसचा प्रत्येक प्रयत्न येथे फसला. गेल्या दोन टर्ममध्ये केवळ मोघे, ठाकरे नको म्हणून गवळी निवडून आल्या. पण महाविकास आघाडी 'वज्रमूठ' बांधून लढत असल्यामुळे यावेळी भाजप विरूद्ध महाविकास (Mahavikas Aghadi) असा थेट सामना होणार आहे. आघाडीने जातीय समीकरणे तपासून उमेदवार दिल्यास यावेळी चांगली संधी आहे. कारण भाजपकडून सध्यातरी लोकसभेचा चेहरा पुढे करण्यात आलेला नाही.

Bhavana Gawali News
Akola Lok Sabha : अकोल्यासाठी ठाकरे-आंबेडकरांनी जुळवलेले गणित; पवारांच्या गुगलीमुळे फिस्कटले?

लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्‍यक असणारी संसाधने गवळींकडे नाही. त्यामुळे आता त्या पूर्णपणे भाजपवर अवलंबून आहेत आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली, तरीही त्यांना पाडायला संजय राठोड तयार बसले आहेत. राठोड शांत जरी बसले तरी बंजारा मतदार महाविकास आघाडीकडे जाणार. कारण पोहरादेवी आणि एकूणच वाशीम जिल्ह्यातील बंजारा समाज हा राठोडांच्या शब्दाच्या बाहेर नाही. भावना गवळी यांनी विकास कामे खेचून आणली नाहीत, असा आरोप होत आहे. त्यामुळे लोक यावेळी गवळींना संधी देणार नाहीत, असं दिसतंय.

बडनेरा ते वाशीम या रेल्वेमार्गाचा सर्व्हे दोन वेळा झाला. भावना गवळींनी या कामाचा पाठपुरावा योग्य पद्धतीने केला असता, तर हे काम त्या खेचून आणू शकल्या असत्या. पण त्यांच्या पूर्ण कारकि‍र्दीत त्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करवून घेतला नाही. केवळ ८० किलोमीटरचा हा मार्ग आहे. हा मार्ग झाल्यास दिल्ली-बंगळूरचे अंतर ६०० किलोमीटरने कमी होणार आहे. हे एक जरी काम त्यांनी केले असते, तर या निवडणूक त्यांच्या विजयाच्या आशा उंचावल्या असत्या.

भावना गवळींना हा अंदाज आला तर त्या लोकसभेचा नाद सोडून आणि भाजप जो उमेदवार देईल, त्याला मदत करून वाशीम जिल्ह्यातील एखादा विधानसभा मतदारसंघ (संभवत रिसोड) मागू शकतात आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय राहू शकतात, असाही काही राजकीय जाणकारांचा कयास आहे. अशा परिस्थितीत भाजपही त्यांना पूर्ण मदत करू शकते. राजकारण आणि क्रिकेट यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. फडणवीसांच्या आदेशावरून संजय राठोड जुने वैर विसरून गवळींना मदत करतील, अशीही शक्यता काही जण व्यक्त करतात. पण तरीही गवळी निवडून येणार नाहीत, असा अंतर्गत सर्व्हेचा निकाल असल्याची माहिती आहे.

Bhavana Gawali News
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

भावना गवळी नाही तर मग कोण, हा प्रश्‍न भाजप नेत्यांसमोर उभा ठाकणार आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता, संजय राठोड यांचेच नाव पुढे येते. भावना गवळींना विधानसभेचा शब्द देऊन राठोडांना पुढे केले जाऊ शकते. ते यवतमाळ व वाशीम दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. सद्यःस्थितीत दोन्ही जिल्ह्यांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यांच्या दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात त्यांची पत्नी किंवा मुलीला संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो. असे असले तरी राठोडांच्या विजयाची पूर्ण खात्री येथे देता येत नाही. कारण ७५ टक्के बंजारा मते जरी राठोडांच्या पारड्यात असल्याचे सांगण्यात येत असले, तरी हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे.

महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली तर २०१९मध्ये यवतमाळ विधानसभा लढलेले संतोष ढवळे यांचा विचार होऊ शकतो. दुसरा चेहरा संजय देशमुख आहेत. संजय देशमुख आधी शिवसेनेत होते. उमेदवारी मिळाली नाही म्हणून अपक्ष लढले आणि तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री झाले. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांचा मतदारसंघ हातून निसटला. नंतरच्या काळात ते भाजपमध्ये गेले आणि एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आले. आता ते विधानसभा लढण्याची तयारी करीत आहेत. पण लोकसभेसाठीही ठाकरे गट त्यांचा विचार करू शकतो. कारण जातीय समीकरणामध्ये ते फिट बसू शकतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबतीत सांगायचे झाल्यास माजी मंत्री मनोहर नाईक यांचे चिरंजीव आमदार इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाशीम जिल्ह्यातील हेवीवेट नेते सुभाष ठाकरे यांचे चिरंजीव चंद्रकांत ठाकरे यांचा विचार केला जाऊ शकतो. दोन टर्मपासून जिल्हा परिषद चंद्रकांत ठाकरे यांच्या ताब्यात आहे आणि जिल्ह्याच्या राजकारणावर ठाकरे कुटुंबीयांची चांगली पकड आहे. इंद्रनील नाइकांच्या बाबतीत कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची परंपरागत मते आणि बंजारा समाजाची मते, असे समीकरण जुळू शकते. आणि हेच समीकरण चंद्रकांत पाटलांसाठी कुणबी समाजाच्या बाबतीत होऊ शकते.

Bhavana Gawali News
Bhandara-Gondia LokSabha : परंपरा सुरु राहणार की इतिहास घडणार; भाजपमध्ये अनेक इच्छुक : पटोलेंची भूमिका महत्त्वाची

१९९९ च्या लोकसभेत हा मतदारसंघ फक्त वाशीम लोकसभा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यावेळी स्वतंत्र लढले होते. राष्ट्रवादीचे जावेद खान यांनी १ लाख ६५ हजार मतदान तेव्हा घेतले होते. राष्ट्रवादीचे संघटन येथे मजबूत आहेत. त्यामुळे चंद्रकांत ठाकरेंना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला विजयाची संधी आहे.

ही जागा कॉंग्रेसकडे आल्यास सध्यातरी आश्‍वासक असा चेहरा कॉंग्रेसकडे नाही. यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडवलेले नेते उत्तमराव पाटील यांचे भाऊ जीवन पाटील आणि मुलगा मनिष पाटील यांचा विचार होऊ शकतो. बंजारा समाजात संजय राठोड यांचे जे स्थान आहे, किंबहुना तेच स्थान कुणबी समाजामध्ये पाटील कुटुंबीयांचे आहे. हे संजय देशमुख, मनोहर नाईक, शिवाजीराव मोघे या सर्वांना चालू शकतात. पण यवतमाळ जिल्हा बॅंकेवरून खासदार बाळू धानोरकर आणि पाटलांमध्ये कुरबुरी झाली होती. त्याचा फटका बसू शकतो.

उत्तमराव पाटलांच्या कुटुंबातून उमेदवारी द्यायची नाही, असे ठरल्यास जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय राहिलेले प्रवीण देशमुख, बंजारा उमेदवार द्यायचा झाल्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटतम मानले जाणारे देवानंद पवार आदींच्या नावावर विचार केला जाऊ शकतो. शेवटी काय तर बंजारा आणि कुणबी मतांचे समीकरण जो योग्यरीत्या जुळवून आणेल, त्या पक्षाचा उमेदवार येथे विजयी होईल, अशी स्थिती आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com