नाना पटोलेंनी असा परतवला प्रफुल्ल पटेलांचा वार, सभापती निवडीचा मार्ग मोकळा...

भंडारा (Bhandara) जिल्हा परिषद परिसरात येण्याचा प्रयत्न करताच त्यांना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. पण राष्ट्रवादीच्या हा गेम कॉंग्रेसला आधीच माहिती पडला.
Nana Patole and Prafull Patel on Bhandara ZP
Nana Patole and Prafull Patel on Bhandara ZPSarkarnama

भंडारा : उद्या १९ मे रोजी भंडारा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड होऊ घातली आहे. पण झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी १० मे रोजी भाजपच्या दोन गटांत मोठा राडा झाला. त्यानंतर उपाध्यक्षासह फुटीर गटाच्या तीन सदस्यांच्या विरोधात ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे उद्याची सभापतींची निवड वांद्यात सापडली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सभापतींची निवड होऊ नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी फिल्डींग लावली होती. गुन्हा दाखल असलेल्या सदस्यांना जामीन मिळू द्यायचा नाही आणि भंडारा (Bhandara) जिल्हा परिषद परिसरात येण्याचा प्रयत्न करताच त्यांना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. पण राष्ट्रवादीच्या हा गेम कॉंग्रेसला आधीच माहिती पडला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वकील आणि कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिशिर वंजारी यांच्यावर सदस्यांना जामीन मिळवून देण्याची जबाबदारी टाकली. त्यांनीही जबाबदारी चोख बजावत पटेलांचा वार परतवला.

कॉंग्रेसने उपाध्यक्षांसह तीनही सदस्यांना आज अटकपूर्व जामीन मिळवून दिला. त्यामुळे उद्याच्या विषय समिती सभापतींच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संदीप ताले, पंचायत सभापती नंदू राहंगडाले आणि उमेश पाटील या तिघांवर ॲट्रॉसीटी ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल झाल्यापासून ते गायब झाले होते. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार हे तिघेही उद्या जिल्हा परिषदेत येणार होते. या तिघांनाही जामीन मिळू द्यायचा नाही आणि जिल्हा परिषदेच्या परिसरात आल्यास अटक करायची, अशी व्युव्हरचना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने या तिघांना रोखून उद्याच्या मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. पण आज सायंकाळीच तिन्ही सदस्यांना कॉंग्रेसने अटकपूर्व जामीन मिळवून दिला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण तयारीवर पाणी फिरवले गेले आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मात देण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले. भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष निवडीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले. ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’, या नानांच्या संतप्त विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून इतर नेत्यांनी नानांचा समाचार घेतला होता.

Nana Patole and Prafull Patel on Bhandara ZP
नाना पटोले यांनी किती वेळा खंजीर खुपसला, याची यादीच राष्ट्रवादीने जाहीर केली...

गुन्हे दाखल झालेल्या सदस्यांना कॉंग्रेसने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बाहेर पाठवले होते. त्यामुळे कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचण्याची एक नामी संधी हाती आली, असे समजून राष्ट्रवादी खेळी करण्याचा प्रयत्न केला. पण कॉंग्रेसनेही कायद्याच्या मार्गाने राष्ट्रवादीचे स्वप्न धुळीस मिळविले. सभापती निवडीच्या उद्याचा ड्रामा हायव्होल्टेज ठरणार, असा अंदाज असताना कॉंग्रेसने आपल्या सदस्यांना पूर्वसंध्येलाच जामीन मिळवून देऊन उद्याच्या निवडणुकीचा मार्ग सुकर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in