
अमर घटारे
Amravati Division Graduate Constituency : निवडणुकीत प्रचारासाठी, वेगळेपण दाखवण्यासाठी, लोकांना आकर्षित करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अधिवेशनात वेगवेगळ्या वेषभूषा करून सभागृहात जाणे, हे पाहण्यात आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अर्धनग्न आंदोलनेही झालेली आहे. पण अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Election) एका उमेदवाराने नवीनच प्रकार केला आहे.
या उमेदवाराचे नाव आहे उपेंद्र बाबाराव पाटील. या महाशयांनी चक्क शर्ट काढून बनियनवर उमेदवारी अर्ज दाखल केला. हा प्रकार बहुधा पहिल्यांदाच झाला असावा. त्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. बनियनवर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात (Divisional Commissioner Office) जात असताना पोलिसांनी (Police) त्यांना रोखले. मात्र मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी परवानगी दिली व त्यांचा अर्ज स्वीकारला. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीसुद्धा शर्ट काढून बनियनवर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आले होते.
गर्दीत बनियनवर आलेले उपेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी लोकांचे लक्ष वेधून घेत होते आणि हे काय चाललंय, अशीही चर्चा परिसरात सुरू झाले. नंतर ते नामांकन दाखल करण्यासाठी आले आहेत, हे स्पष्ट झाले. यावेळी उपेंद्र पाटील म्हणाले, कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, पटसंख्येचा निकष लावून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये, शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पदवीधर बेरोजगार यांना न्याय मिळावा, यासाठी आपली उमेदवारी आहे.
...तर नाहीच घालणार नाही शर्ट !
या निवडणुकीत मतदारांनी आशीर्वाद दिला आणि निवडून आलो तर उपरोक्त मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लढा देईन. मागण्या पूर्ण होईपर्यंत अंगात शर्ट घालणार नाही, असा निर्धार उपेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. २०१२ पासून शिक्षकांची भरती बंद आहे. जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. पोलिस भरतीसाठी वकील आणि उच्चशिक्षित लोक जाताना दिसतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी माझा उमेदवारी अर्ज असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.