
नागपूर : महाराष्ट्रात (Maharashtra) कोळसा टंचाई आहे, अशी बोंबाबोंब करून लोडशेडींगची भिती दाखवली जात आहे. राज्याला लोडशेडींगपासून (Load Shading) वाचवण्यासाठी परदेशातून महागडा कोळसा आणण्यासाठी विविध कारणे पुढे केली जात आहे. मात्र त्याच वेळी आपल्या प्रदेशातील कोळशाची काळाबाजारी सुरू आहे, असा घणाघाती आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला.
यासंदर्भात माहिती देताना प्रशांत पवार (Prashant Pawar) म्हणाले, हिंद महामिनरल कोल वॉशरीजच्या खाते पुस्तकात तब्बल १ लाख २० हजार टन कोळशाची तफावत दाखवत आहे. त्यामुळे हा कोळसा गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या कागदपत्रांत हिंद महामिनरल कोल वॉशरीजच्या खातेवहीत फेब्रुवारी २०२२, मार्च २०२२ मध्ये ५४ हजार ५५४ टन व ६५ हजार २८४ टन कोळशाची तफावत आहे. रिजेक्ट कोळसा (Coal) खुल्या बाजारात विकल्यावर किंवा एखाद्या पॉवर प्लांटला दिल्यावरच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळसा कमी होऊ शकतो. खुल्या बाजारात रिजेक्ट कोलची किंमत १५ हजार रुपये प्रतिटन इतकी आहे. या दराने गायब झालेल्या कोळशाचा हिशेब लावल्यास १८० कोटींची ही उलाढाल होते.
मुळात कोळसा धुतल्याच जात नाही. फक्त कागदोपत्री वॉश कोल आणि रिजेक्ट कोल असे दर्शविले जाते. चांगला कोळसा खुल्या बाजारात चढ्या दराने विकला जातो. अनेक खाजगी पॉवर प्लांट याच कोळशावर विजेची निर्मिती करते. मात्र महावितरणला हा कोळसा चालत नाही. कोल वॉशरी उघडण्याचा हाच मुख्य उद्देश आहे. यात महाजेनको आणि राज्य खनिकर्म महामंडळाचे अधिकारी गुंतले आहेत. जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने सातत्याने या विरोधात आवाज उठवला जात आहे. ईडी आणि सीबीआयकडेसुद्धा या प्रकाराचे दास्तावेज जय जवान जय किसान संघटनेने सादर केले आहेत. याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप एकाही यंत्रणेने तपास सुरू केला नाही.
जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, सचिव अरुण वनकर आणि समन्वयक विजयकुमार शिंदे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून हा गैरप्रकार उघड केला आहे. राज्यात कोळसा टंचाई आहे. लोडशेडिंगची भीती वर्तविली जात आहे. महागडा कोळसा परदेशातून खरेदी केला जात आहे. मात्र आपल्याच कोळशाचा काळाबाजार होत असताना ऊर्जामंत्री तसेच राज्यातील नेते गप्प का आहेत, असा सवाल प्रशांत पवार यांनी उपस्थित केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.