एका आण्याच्या गांजावरून सामना-तरूणभारतमध्ये रंगला ‘सामना’

मुख्यमंत्री Uddhav Thackeray विजयादशमीच्या शिवसेनेच्या मेळाव्यात काय बोलतात, हे कळत नाही. मर्यादा सोडून बोलतात, याला काय म्हणावे, असा प्रश्‍न आमदार व्यास MLA Girish Vyas यांनी उपस्थित केला.
MLA Girish Vyas
MLA Girish VyasSarkarnama

नागपूर : एका आण्याचा गांजा ओढला की, नवनवीन कल्पना सुचतात, असे संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना उद्देशून म्हटले होते. त्याला उत्तर देताना गांजा कुणी कुणी ओढला, असा सवाल संघ आणि भारतीय जनता पक्षाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारत या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. ‘तभा’च्या अग्रलेखाची आज राज्यभर चर्चा होते आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीष व्यास यांना विचारणा केली असता, या अग्रलेखातून सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या राजकारणावर टिका करण्यात आलेली असल्याचे ते म्हणाले.

आमदार व्यास म्हणाले, आजच्या अग्रलेखात जे काही म्हटले आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तो उपरोधिक म्हणून आहे. गांजा कुणी कुणी ओढला, याचा मथितार्थ असा की, गांजा ओढल्यानंतर माणूस जसा बेफाम होतो, बेछूट काहीबाही बोलत सुटतो, त्यापद्धतीने सध्या महाविकास आघाडीचे नेते बोलत सुटले आहेत. गांजा ओढल्यानंतर जे होते, तशी स्थिती आघाडीच्या नेत्यांची झालेली आहे. मुख्यमंत्री विजयादशमीच्या शिवसेनेच्या मेळाव्यात काय बोलतात, हे कळत नाही. मर्यादा सोडून बोलतात, याला काय म्हणावे, असा प्रश्‍न आमदार व्यास यांनी उपस्थित केला.

आपल्या राज्यात सध्या काय परिस्थिती आहे आणि काय केले पाहिजे, हे न सांगता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टिका करतात, केंद्र सरकारवर टिका करतात. ज्या भाषेत ते बोलतात, ती भाषा मुख्यमंत्र्यांच्या पदाला शोभत नाही. म्हणून अग्रलेखात ‘गांजा कुणी कुणी ओढला’, या वाक्याचा प्रयोग केला असेल. शरद पवार जाणते नेते आहेत, त्यांनी तरी विचार करून बोलले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पण ते सुद्धा हल्ली काहीबाही बोलत सुटले आहेत. त्यामुळेच आजच्या अग्रलेखातून उपरोधिक टिका झाली असेल. ते स्वतः इतरांच्या बाबतीत वाट्टेल ते बोलतात, मग त्यांनी ऐकायचीही तयारी ठेवली पाहिजे, असे गिरीष व्यास म्हणाले.

आजच्या अग्रलेखानंतर सामना आणि तरुण भारत असा ‘सामना’ रंगणार का, असे विचारले असता ते म्हणाले, सामना काय करतो आणि सामनाच्या प्रती किती छापल्या जातात, किती लोक वाचतात, हे सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे. तरुण भारत हे वृत्तपत्र आणि त्यातील अग्रलेख याची जी आज किंमत आहे, सामना त्याच्या आसपासही कुठे फटकू शकत नाही, हे वाचक म्हणून माझे मत आहे. वृत्तपत्रांनी आपली मर्यादा ठेवली पाहिजे, ती सामना या वृत्तपत्राने गमावली आहे. लेखनाचा स्तर गमावला आहे. कोणत्याही वृत्तपत्राच्या संपादकाने असे समजू नये की, ते राज्याला, देशाला दिशा देत आहे, असे म्हणत त्यांना सामनाचे संपादक संजय राऊत यांचे नाव न घेता टोला हाणला.

ते संपादक मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करतात आणि मुख्यमंत्री तसेच वागतात, याला स्वच्छ राजकारण म्हणत नाहीत, तर हे षडयंत्रकारी राजकारण आहे. राज्यातील जनता योग्य वेळी याचे उत्तर देईल. मंत्रालयात एखादे काम घेऊन गेल्यावर ते नियमांत जरी असेल, तरीही मंत्र्यांचा आदेश झाल्याशिवाय त्यांचे ओएसडी ती फाईल पुढे जाऊ देत नाहीत. याचा अनुभव आम्हा आमदारांना येतो. काम थांबविले जाते आणि मग एखादा व्यक्ती येतो आणि सांगतो की ‘येवढे येवढे’ द्या तुमचे काम होऊन जाईल. सर्वच विभागांत ही स्थिती आहे. प्रत्येक कामाची रेटलिस्ट आहे, हे आम्हाला जाणवते, असेही आमदार गिरीष व्यास म्हणाले.

MLA Girish Vyas
एकाच वाक्याने झालो होतो प्रेरित : आमदार गिरीष व्यास

आमच्या सरकारच्या काळात अशी स्थिती नव्हती. त्यामुळे वसुलीसाठी त्यांनी सॉफ्टवेअर तयार केले आहे, याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळेच या सरकारला वसुली सरकार म्हटले जाते. या सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेहमी एकच वाटते की, आपण किती दिवस आहो, हे माहिती नाही. त्यामुळे मिळेल तेवढे जमा करून घ्या, अशा वृत्तीने ते काम करत आहेत, अशी घणाघाती टिका आमदार गिरीष व्यास यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in