यवतमाळातील महिलांनी पंतप्रधान मोदींना मकर संक्रांतीची दिली ‘ही’ अनोखी भेट...

गॅस सिलिंडरचे भाव तिपटीने वाढले आहेत. सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडणारी ही भाववाढ आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसतर्फे (Congress) यवतमाळमध्ये (Yavatmal) हे अभियान राबविण्यात आले.
Congress Yavatmal
Congress YavatmalSarkarnama

यवतमाळ : फसवी उज्वला गॅस योजना व सिलिंडरच्या प्रचंड भाववाढीने कंटाळलेल्या महिलांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी मोदी (Narendra Modi) सरकारला उज्वला योजनेतील गॅस सिलिंडरचे वाण परत पाठवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे. काँग्रेसच्या (Congress) पुढाकाराने प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, माजी आमदार विजयाताई धोटे यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जाऊन महिलांनी गॅस सिलिंडर परत केले.

२०१४ पूर्वी गॅस सिलिंडर चे दर ३०० ते ३५० रुपयांदरम्यान होते. त्यावेळी सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्ते महागाई असल्याची ओरड करून आंदोलने करत होते. मात्र सद्यःस्थितीत देशभरात गॅस सिलिंडरचे भाव तिपटीने वाढले आहेत. सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडणारी ही भाववाढ आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसतर्फे यवतमाळमध्ये (Yavatmal) हे अभियान राबविण्यात आले.

मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी प्रदूषण व महिलांच्या आरोग्याचे कारण देऊन १०० रुपयांमध्ये गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात ते मोफत कनेक्शन नव्हते तर सिलिंडर, शेगडी व इतर साहित्याची रक्कम त्यांच्या सबसिडी मधून कापण्यात आली. ही ग्रामीण भागातील अशिक्षित गरीब जनतेची मोठी फसवणूक होती. आता तर गॅस सिलिंडरचे दर एवढे प्रचंड वाढले आहेत की नोकरदार वर्गालाही या महागाईने नाकी नऊ आले आहेत. तर ग्रामीण जनता एवढे महागडे सिलिंडर घेऊच शकत नाही. ही योजना पूर्णपणे फसवी व केवळ उद्योगपतींचे खिसे गरम करणारी असल्याची घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी केली.

Congress Yavatmal
यवतमाळ येथील ‘त्या’ घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल...

काँग्रेसच्या काळात गॅस दर वाढले तरी त्यावर थेट सबसिडी देऊन त्याचा भार ग्राहकावर पडू दिला जात नव्हता. सुरुवातीला गॅसचा काळाबाजार थांबविण्याच्या नावाखाली सामान्य ग्राहकांना मूळ रकमेत सिलिंडर घेण्यास भाग पाडण्यात आले. सबसिडीची रक्कम बँक खात्यात येत होती. मात्र ही रक्कम हळूहळू कमी करण्यात आली. सद्यःस्थितीत केवळ १९ रुपये एवढी अत्यल्प सबसिडी खात्यात जमा होते. त्यामुळे महिलावर्गात प्रचंड संताप आहे. सरकारने त्वरित गॅस सिलिंडरचे दर काँग्रेस सरकारच्या काळात होते तेवढे करावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.

या आंदोलनात नगरसेवक तथा चिटणीस जावेद अन्सारी, नगरसेवक तथा शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य भारत राठोड, जिल्हा सरचिटणीस किरण कुमरे, नगरसेवक दर्शना इंगोले, उषा दिवटे, माजी सभापती राजेंद्र हेंडवे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत इंगोले, बबली, नगरसेवक शब्बीर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर, काँग्रेस कमिटी सचिव विठ्ठल आडे, जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव प्रदीप डंभारे, दत्ता हाडगे, लोकेश इंगोले, सैयद हनीफ, मुजफ्फर पटेल, आरिफ खान, मोहम्मद फारुख, अहमद शाह, भास्करराव सावरकर, लालसिंग अजमेरकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in