विदर्भातील चार खासदार व तीन आमदारांचे बंड अखेर पत्थ्यावर...

नीलम गोर्‍हे यांनी झरी (Zari Jamani) तालुक्यातील कुमारी मातांचा प्रश्‍न ऐरणीवर आणला. परंतु, रावते यांच्या नंतर अरविंद सावंतांनी विदर्भातील प्रश्‍नांकडे लक्ष दिले नाही.
Shivsena Zari Jamani
Shivsena Zari JamaniSarkarnama

यवतमाळ : शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नव्याने पक्षबांधणीचा झंझावात सुरू केला आहे. युती व महाविकास आघाडीसोबत सत्तेत असताना विदर्भात पक्षबांधणीकडे पक्षप्रमुखांचे कायम दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बंडानंतर विदर्भात आज शिवसेनेला मोठे खिंडार पडलेले दिसत आहे.

विदर्भातील (Vidarbha) शेतकरी आत्महत्या, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, कुमारी मातांचे प्रश्‍न आदी प्रश्‍नांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लक्ष घातले. पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख दिवाकर रावते (Diwarkar Rawate) यांच्या नेतृत्वात शेतकरी दिंडी काढण्यात आली. संपूर्ण विदर्भ पिंजून काढण्यात आला. तर, नीलम गोर्‍हे (Nilam Gorhe) यांनी झरी जामणी (Zari Jamani) तालुक्यातील कुमारी मातांचा प्रश्‍न ऐरणीवर आणला. परंतु, रावते यांच्या नंतर अरविंद सावंतांनी (Arvind Sawant) विदर्भातील प्रश्‍नांकडे लक्ष दिले नाही. त्यांनी खासदार, आमदारांच्या बैठका घेऊन सोपस्कार तेवढे पार पाडले. परिणामी विदर्भात पक्ष मजबूत होऊ शकला नाही. विदर्भ मूळात काँग्रेसचा गड आहे. काँग्रेसी विचारधारा येथील मातीत रुजली आहे. परंतु, 2014 नंतर भाजपने या गडाला सुरूंग लावला. असे असले तरी येथील तरुणांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्याचाच परिणाम म्हणून विदर्भात खासकरून पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन खासदार व चार आमदार गेल्या निवडणुकीत विजयी झाले.

2014 मध्येही विदर्भात सेनेचे चार आमदार होते. शिवसेनेने विदर्भात पाय रोवले खरे, परंतु युतीत व महाविकास आघाडीत सत्तेत असताना शिवसेनेने विदर्भात पक्षवाढीसाठी फार काही केल्याचे दिसत नाही. त्यामुळे नव्याने पक्ष बांधणी करताना मोठे आव्हान आहे. विदर्भातील चार खासदार आणि तीन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सत्तेत असल्याचे त्यांच्या लाभार्थी कार्यकर्त्यांनी पक्षाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी विदर्भातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना पक्षबांधणीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सत्तेच्या मलाईची चटक लागलेले कार्यकर्ते सत्ता गेल्यानंतर पुन्हा सत्तेच्या मोहात पडताना दिसत आहेत. हीच खरी अडचण पक्षबांधणीत आहे. परंतु, सत्ता असताना शिवसेनेने विदर्भात पक्षबांधणीसाठी काय केले हा खरा प्रश्‍न आज पक्षप्रमुखांना विचारण्याची गरज आहे. हिंगोली-उमरखेडचे खासदार हेमंत पाटील, यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी व रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे चारही खासदार शिंदे गटात गेले आहेत.

शिंदे गटात ३ संजय..

शिवसेनेचे दिग्रसचे आमदार संजय राठोड, बुलडाण्याचे संजय गायकवाड व मेहकरचे संजय रायमूलकर हे तिन्ही संजय शिंदे गटात सहभागी झाले आहेत. केवळ बाळापूरचे आमदार नितीन देशमुख शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेत असताना या खासदार व आमदारांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी उभी केली. जिकडे नेता तिकडे आम्ही या कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेला पक्षबांधणी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यवतमाळातून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या शिवसेनेच्या प्रा. तानाजी सावंत व दृष्यंत चर्तुर्वेदी यांनी तर विदर्भासाठी काय केले, असा प्रश्‍न जनता विचारत आहे. सत्ता भोगणारे नेतेच जर पक्षासाठी काही करणार नसतील तर पक्ष वाढणार कसा, हाच प्रश्‍न आज अधोरेखित झाला आहे. शिवसेनेला पक्ष वाढविण्यासाठी कट्टर शिवसैनिकांकडे पक्षबांधणीची जबाबदारी नव्याने देऊन नव्या जोमाने सुरूवात करावी लागणार आहे. त्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांवर विश्‍वास दाखवावा लागणार आहे.

Shivsena Zari Jamani
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना हात जोडले ; ठाकरे-राऊतांवर भाष्य करण्याची गरज नाही !

नेत्यांचा सामान्य नागरिकांशी ’कनेक्ट’ नव्हता..

महाराष्ट्रात युती व महाविकास आघाडीसोबत शिवसेना सत्तेत होती. सेनेच्या विदर्भातील खासदार, आमदारांनी व विधान परिषद सदस्यांनी पक्षवाढीसाठी काय केले, हा प्रश्‍न जनतेला पडला आहे. मंत्री झाल्यावर, खासदार झाल्यावर  नेत्यांचा जनतेसोबत ’कनेक्ट’च नव्हता, असा जनतेचा आरोप आहे. सामान्य नागरिक या नेत्यांना भेटू शकत नव्हता. मग, पक्ष कसा वाढणार, हाच खरा प्रश्‍न आहे. सेनेचे नेते नेहमी 'खास' कार्यकर्ते, ठेकेदारांनी घेरलेले असत. रक्षाबंधनानिमित्त नेत्याला राखी बांधण्यासाठी आलेल्या सामान्य कार्यकर्त्या महिलेला तासनतास नेत्यांची प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र अनेकांनी बघितले आहे. सत्तेतील ’हाय प्रोफाफाईल’पणा नेत्यांनी स्वीकारल्याने सामान्य माणूस शिवसेनेसोबत जुळू शकला नाही, हेच सत्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in