आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांना पळता भुई थोडी…

मोहाडी नगरपंचायतीची निवडणूक झाल्यापासून येथे भाजपच्या (BJP) दोन गटांत सत्ता स्थापनेवरून दररोज समीकरण बदलत होते.
BJP Elected members
BJP Elected membersSarkarnama

भंडारा : मोहाडी नगर पंचायतीमध्ये भाजपच्या दोन गटांत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजपच्या ‘त्या’ दोन नगरसेवकांच्या गटांत पुन्हा बिनसले असल्याची माहिती समोर आली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर काही जण निवडणूक झाल्यानंतर माजी आमदार चरण वाघमारे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या तुमसर येथील कार्यालयात गेले होते. पण तेथे त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली आणि त्यानंतर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांना पळता भुई थोडी झाली, अशी विश्‍वसनीय माहिती आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी नगर पंचायत निवडणुकीत एकत्र आलेले भाजपचे (BJP) हे दोन्ही गट पुन्हा दुरावले आहेत. मोहाडी नगरपंचायतीची (Nagar Panchayat) निवडणूक झाल्यापासून येथे भाजपच्या दोन गटांत सत्ता स्थापनेवरून दररोज समीकरण बदलत होते. मोहाडीची जनताही त्यांच्या नौटंकीला पार वैतागली होती. भाजपच्या दोन गटात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशीच सायंकाळी पुन्हा राडा झाल्याची माहिती विश्‍वसनीय माहिती समोर आली आहे. आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या ४ नगरसेवकांच्या गटासोबत माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांचा मोठा वाद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी होणाऱ्या विषय समितीच्या निवडणुकीत अजून काय काय भानगडी होतात, याकडे तमाम जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

मोहाडी नगरपंचायतीत भाजपला बहुमत असतानाही त्यांच्यात दोन गट पडल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडीबद्दल विविध तर्क वितर्क लावले गेले. असे असताना नागपुरातील धरमपेठ येथील बंगल्यावरून आदेश आल्यानंतर दोन्ही गटांची दिलजमाई झाली व दोन्ही पदे भाजपच्या झोळीत पडली. मात्र विजयी मिरवणुकीत दुसऱ्या ५ नगरसेवकांच्या गटातील एकही सदस्य सहभागी नसल्याने पुन्हा दोन गटांत बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी असंतुष्ट गटातील नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेता, नगरसेवक व इतर तीन लोक माजी आमदारांना भेटायला त्यांच्या तुमसर कार्यालयात गेले होते. तेथे मोबाईल फोनवर रेकॉर्डिंग करण्याच्या कारणावरून माजी आमदार व भेटायला गेलेल्या नगरसेवकात चांगलाच राडा झाला. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

BJP Elected members
भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी पोहोचली चरम सीमेवर...

माजी आमदारांच्या कार्यालयात हाणामारी झाल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतरांनी तेथून काढता पाय घेतला. या घटनेनंतर आता त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे मोहाडी नगर पंचायत आता कुस्तीचा आखाडा तर बनणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर चरण वाघमारे यांच्या पाच सदस्य असलेल्या दुसऱ्या गटातील एका नगरसेवकाने नुकतेच नवनियुक्त अध्यक्षांचे पद धोक्यात येईल, असे जात वैधतेबाबतचे एक दस्तावेज समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने या वादात आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. एकाच पक्षाचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असल्याने मोहाडीची जनता संभ्रमात आहे. त्यामुळे चार दिवसानंतर विषय समित्यांची निवडणूक असल्याने या निवडणुकीत अजून नवीन कोणते चित्र पाहायला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.

रेकॉर्डिंगसाठी विरोध केला : चरण वाघमारे

याबाबत माजी आमदार चरण वाघमारे यांना विचारले असता, मारहाणीचा प्रकार घडला नसल्याचे ते म्हणाले. आपल्याला न विचारता मोबाईल फोनवर रेकॉर्डिंग केले जात असल्याने त्याचा विरोध आपल्या कार्यकर्त्यांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीत पक्षाने त्यांचे म्हणणे ऐकले नसल्यामुळे वाघमारे नाराज आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. पण अशा भांडणांमुळे मोहाडीचा विकास होईल की कामासाठी भांडणे होऊन विकास रखडेल, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मात्र दोन गटांतील भांडणामुळे येथील जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, या म्हणीप्रमाणे येथे काही होऊ नये, असे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वाटत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in