माजी ऊर्जामंत्र्यांनी विद्यमान ऊर्जामंत्र्यांना दिला ‘ती’ स्थगिती उठवण्याचा सल्ला...

त्रस्त नागरिकांनी थेट वीज वितरण कार्यालयाची तोडफोड केली. असे प्रकार घडू नये, यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक असल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.
Chandrashekhar Bawankule and Dr. Nitin Raut
Chandrashekhar Bawankule and Dr. Nitin RautSarkarnama

नागपूर : राज्यातील विद्युत संकट नियंत्रणात आल्याची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली खरी, पण अघोषित भारनियमनामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. कोराडी विद्युत निर्मिती प्रकल्पातील दोन संच नव्याने बांधण्यात येणार होते, पण महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) स्थगिती दिल्याने विदर्भात विद्युत संकट उभे राहिले. ही स्थगिती उठविण्याची मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

राज्यातील महावितरणचे नियोजन गेल्या तीन दिवसांत पूर्णतः गडबडले आहे. रात्री अपरात्री अघोषित भारनियमन होण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच वाढत्या तापमानामुळे सामान्यांचा जीव मेटाकुटीला आला असताना वीज खंडित होत असल्याने शांत झोपही शक्य नसल्याचा राग नागरिकांच्या मनात आहे. याच जनाक्रोशाचे दर्शन बिनाकी मंगळवारी भागात झाले असून येथील त्रस्त नागरिकांनी थेट वीज वितरण कार्यालयाची तोडफोड केली. असे प्रकार घडू नये, यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक असल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.

सातत्याने वाढत्या अघोषित भारनियमनावर आमदार बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. विदर्भातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस सरकारने कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातील जुने संच पाडून दोन अत्याधुनिक संच उभारण्याचे आदेश पारित केले होते. ते पूर्णत्वास आले असते तर तब्बल १३०० मेगावॅट विद्युत निर्मिती शक्य होती. परंतु फडणवीस सरकारच्या आदेशांना महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली असून ती स्थगिती उठविण्याची मागणी आमदार् बावनकुळे यांनी केली आहे.

राज्यातील ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील काही संच ३० ते ४० वर्ष जुने आहेत. ते संच आवश्यक तेवढा कोळसा देऊनही विजेची निर्मिती करीत नसल्याने ते बदलण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. परंतु राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठलाही विचार न करता, महत्वाच्या वीज निर्मिती प्रकल्पांना स्थगिती देण्याचे धोरण राबविल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule and Dr. Nitin Raut
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केतकी चितळेचे कान टोचले!

राज्यात महाजेनको कंपनीची वीज निर्मितीची क्षमता साधारणतः सात हजार मेगावॅटच्या घरात आहे. या क्षमतेतही नवीन संच उभारणीमुळे वाढ झाली असती. ज्याचा फायदा थेट राज्याला झाला असता असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. परंतु कुठलाही विचार न करता स्थगिती दिल्याने आज राज्य अंधारात जाण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com