Pusad
PusadSarkarnama

Pusad : किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी, बांशी ठरली महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत...

पुसद (Pusad) तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बांशी गावात ११ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.

पुसद (जि. यवतमाळ) : पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घातली आहे.

पुसद (Pusad) तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बांशी गावात ११ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल (Mobile) बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. याशिवाय शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री (Prime Minister) सुरक्षा विमा योजना लागु करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे तीनही ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या गहुली गावाला बांशी, चोंढी या गावावरून जावे लागते. एकेकाळी गहूली आदर्श ग्राम होते. नंतर चोंढीनेही ग्रामविकास पुरस्कार मिळवला. आता बांशीने मोबाईल बंदीचा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे.

अलीकडे तरुण मोबाईल वेडे झाल्याचे पहावयास मिळते. मोबाईलचे निश्चितच चांगले फायदे आहेत. मात्र, योग्य वापराअभावी नवी पिढी भरकटत आहे. काही मोबाईल गेममध्ये आपला वेळ खर्च घालत आहे तर अश्लील साईट वरील गैरवापरामुळे कुणाचे पाऊल वाकडे पडत आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आले खरे, मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम दिसून आले. किशोरवयीन मुलांना चांगल्या- वाईट या गोष्टींची अजुन समज आलेली नाही. अशा स्थितीत स्मार्ट फोनचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याने ऑनलाइन शिक्षणाचे तीन-तेरा वाजलेले आपल्याला पहावयास मिळाले.

अनेक मुलांना या मोबाईलमुळे गेम्स, वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागलेले असून हे दुष्परिणाम बान्सी गावातील नागरिकांना अनुभवास आले. त्यामुळे ग्रामसभेने अठरा वर्षाखालील मुलांसाठी मोबाईल वापरावरिल बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे मुलांच्या हाती कोणीही पालक मोबाईल देणार नाही. या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी युवा सरपंच, गजानन टाले होते. तसेच उपसरपंच रेखा राठोड, सचिव पी.आर. आडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष आगलावे, अभय ढोणे, माधव डोंगरे, इंदु तांबारे, शोभा आगलावे, मंगल शर्मा, सुनिता लथाड, पंकज बुरकुले, जि.प मराठी शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यशवंत देशमुख, आरोग्य उपकेंद्राचे सामुदायिक विकास अधिकारी डॉ. गोरमाळी तसेच लाईनमन भालेराव, जुगलकिशोर शर्मा व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Pusad
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; 1 हजार 166 गावांमध्ये राजकीय रणधुमाळी

गावातील शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. मोबाईलमध्ये गुंतले असताना ही मुले आई-वडिलांचे काहीएक ऐकत नाहीत. काहीजण पबजीसारखे गेम खेळतात, तर काही वाईट साईट्स बघतात. ऑनलाइन शिक्षणापेक्षा हा धिंगाणा विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक आहे. ते टाळण्यासाठी मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला. अंमलबजावणी करताना अडचणी येतील. मात्र समुपदेशनातून या अडचणी दूर करू. प्रसंगी दंड व टॅक्स लावावा लागेल. परंतु ग्रामस्थांचा या निर्णयाला एकमुखी पाठिंबा आहे.

- गजानन टाले, सरपंच, बांशी, ता. पुसद.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com