आग विझवणाऱ्याचा सत्कार होतो, तर आगलाव्यांना लोक सोडत नाहीत…

आपली शेती पिकली नाही म्हणून शेजारच्याने माझा धुरा फोडला, त्यामुळे पाणी घेता आले नाही, अशा सबबी सांगण्यासारखा चिमुरचा प्रकार आहे, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
आग विझवणाऱ्याचा सत्कार होतो, तर आगलाव्यांना लोक सोडत नाहीत…
Vijay WadettiwarSarkarnama

जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : आपल्या गावात जेव्हा आग लागते, तेव्हा गावातलाच एखादा तरुण हिरिरीने पुढाकार घेतो आणि जिवाची परवा न करता आग विझवतो. मग लोक त्याचे नाव घेतात, त्याचा उदो उदो होतो. पण हे करताना लोक आग लावणाऱ्यालाही शोधत असतात आणि आगलाव्यांना लोक सोडत नाही, असे म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता भाजपला जोरदार टोला हाणला.

तुमचं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये टाकायचं की आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये, हे जनता ठरवत असते. आगलाव्यांना त्यांच्या केल्याची किंमत मोजावी लागते. आज शांत असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) आग कोण लावत आहे, हे जनतेला कळून चुकले आहे. कुणाला भोंगे घेऊन तर कुणाला हनुमान चालिसा घेऊन महाराष्ट्रात आग लावण्यासाठी पाठवले आहे. पण राज्य सरकार जबाबदारीने काम करते आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असे मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

निधी आमदाराचा नाही, तर जनतेचा..

सरकारचा निधी हा कुण्या आमदारासाठी (MLA) नसतो, तर तो त्या क्षेत्रातल्या जनतेसाठी असतो. चिमुरच्या आमदारांनी निधी मागितलाच नाही. त्यांनी मागितला तर नक्की देऊ. कारण विकास कामे कुणीही केली, तर त्याला समर्थन केले पाहिजे. विकास करणाऱ्याला मी कधीच अडवत नाही. आताही त्यांनी यावे मागणी करावी, त्याच्या मतदारसंघासाठी निधी घेऊन जावा आणि त्यातून विकास कामे करावी.

जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही आपण चिमूर विधानसभा मतदारसंघासाठी निधी देत नाही, असा आरोप केला जातो, याबद्दल विचारले असता वडेट्टीवार यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. काल चिमूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आपण काम करायचे नाही आणि शेजाऱ्याला दोष द्यायचा याला काही अर्थ नाही. आपली शेती पिकली नाही म्हणून शेजारच्याने माझा धुरा फोडला, त्यामुळे पाणी घेता आले नाही, अशा सबबी सांगण्यासारखा चिमुरचा प्रकार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
ओबीसी लढ्याची धार झाली तीव्र; बावनकुळे, वडेट्टीवार, पटोले पुन्हा आले एकत्र...

येथील दोन रस्त्यांच्या वादाबाबत ते म्हणाले, त्या रस्त्याचे ठेकेदार कोण आहे, त्यात भागीदारी कुणाची आहे, हे चिमूरकरांना माहिती आहे. रस्त्याच्या आणि इतरही कामांत किती खोदकाम केले, कसे केले याच्या बातम्या मी रोज वर्तमानपत्रात वाचतो. पण विकासाला मी कधीच आडवा येत नाही, तो माझा स्वभाव नाही. कुणीही करावी, पण विकासाची कामे करणाऱ्यांना मी समर्थनच करतो. आणि रस्त्याच्या वाद आत न्यायालयात गेला आहे. त्यामुळे त्यामध्ये आता मी काही करू शकत नाही.

चांगलं झालं तर मी केलं, अन्...

चिमूर मतदारसंघात एखादं चांगलं काम झालं, तर ते काम मी आणलं, अशा फुशारक्या मारायच्या आणि काही काम नाही झालं, तर ते वडेट्टीवारांमुळे नाही झालं, असा आरोप करण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याचे चिमूरच्या आमदारांचे नाव न घेता वडेट्टीवार म्हणाले. एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची घेतलेली जमीन परत देता येत नाही. उद्योग आणि पॉवर प्रोजेक्टच्या नावाखाली काही लोकांनी गरिबांच्या जमिनी घेतल्या, पण त्यानंतर उद्योग मात्र येथे आले नाही, असा आरोप मंत्री वडेट्टीवार यांनी केला. त्या जमिनींची काय विल्हेवाट लावली, याचीही माहिती नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.