आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर

१२वीमध्ये असतानाच शेतकरी नेते स्व. शरद जोशी Sharad Joshi यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी Ravikant Tupkar शेतकरी चळवळीत उडी घेण्याचा निर्णय घेतला.
आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर
Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : रविकांत तुपकर हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेलं शेतकरी चळवळीतील नावं. महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ, युवकांचे आयकॉन, शेतकरी नेते, आंदोलन सम्राट, शेतकऱ्यांसाठी लाल दिव्याला अर्थात सत्तेच्या पदाला लाथ मारणारा खरा शेतकरी लढवय्या यांसह अनेक उपाध्या या नेतृत्वाला दिल्या जातात.

रविकांत चंद्रदास तुपकर हा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा. बुलडाण्यापासून जवळच डोंगरकाठावर वसलेले सावळा हे त्यांचे गाव. कुटुंबातील कुणालाच राजकारणाचा वारसा नाही. आई-वडील हाडाचे शेतकरी. रविकांत तुपकर याचं प्राथमिक शिक्षण बुलडाणा तालुक्यातील दहिद बुद्रूक येथे मामाच्या गावी झाले. त्यानंतर १२वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी भारत विद्यालयात घेतले. सावळा ते बुलडाणा असा दररोज ८ ते १० किलोमीटरचा सायकलप्रवास करून ते बारावी सायन्समध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर कला शाखेतून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा शेती हा परंपरागत व्यवसाय होता शिवाय त्याला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायदेखील होता. रविकांत तुपकर यांनी देखील दररोज सकाळी बुलडाणा शहरात घरोघरी दूध वाटपाचे काम केले. सायकलवर शहरात दूध वाटायचे आणि नंतर शाळेत जायचे. १२वीमध्ये असतानाच शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शेतकरी चळवळीत उडी घेण्याचा निर्णय घेतला.

पाण्यासाठी विहिरीत केले आंदोलन..

आयुष्यातील पहिले आंदोलन त्यांनी गावातील विहिरीत केले. गावात पाण्याची मोठी समस्या होती. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी चक्क विहिरीत बसून उपोषण केले आणि त्यांच्या आंदोलनाच्या ऋंखलेची सुरुवात झाली. शेतकरीपुत्रांची अवैध शिकवणी वर्गात होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यानंतर शेतकऱ्यांचे जिल्हा बॅंकेने सोसायटीमार्फत घेतलेले शेअर्स परत मिळावे, शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न, खते आणि बियाणांचा प्रश्न, पीककर्ज या विषयांवर त्यांनी आंदोलनांना सुरुवात केली. कधी अर्ध नग्न तर कधी स्वत:ला खड्ड्यात गाडून घेत आंदोलनांचा सपाटा लावला. कधी रास्तारोको, कधी बैलगाडी, जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, कधी रेल्वे रोको, एखादा अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असल्यास त्या कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांसह मुक्काम ठोकणे यांसह विविध लक्षवेधी आंदोलने त्यांनी केली. शेतकरी चळवळीत त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. ‘रविकांत तुपकर आणि आंदोलन’ असे समीकरणच तयार झाले. कालांतराने रविकांत तुपकरांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासोबत कामाला सुरुवात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नेला मृत बैल..

पशुवैद्यकांचा संप सुरू असताना उपचाराअभावी शेतकऱ्याचा बैल दगावला. तेव्हा मृत बैल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत तुपकरांनी लक्ष वेधले होते. त्यानंतरही बरीच आक्रमक आंदोलने त्यांनी केली. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालकांनी थकविलेल्या कोट्यवधींच्या कर्जामुळे डबघाईस आली. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना फटका बसला. त्यावेळी रविकांत तुपकरांनी जिल्हाभर आंदोलन पेटविले. बॅंकेत घुसून शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे त्यांनी पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा बँक आणि थकीत संचालक यांच्या विरोधात त्यांनी रणसंग्राम उभारला. अगदी मुंबईत मंत्रालयापर्यंत हे आंदोलन गाजले. सुमारे वर्षभर रविकांत तुपकरांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार व प्रस्थापितांच्या विरोधात खंबीरपणे लढा दिला. हा लढा निर्णायक ठरला होता. थकीत संचालकांवर कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता.

नववधूसह मेळघाटात...

दरम्यानच्या काळात आंदोलनांमुळे त्यांच्यावर बरेच गुन्हे दाखल झाले. तर दुसरीकडे प्रस्थापित नेत्यांना तुपकरांनी मोठा हादरा दिल्याने सर्वांनीच तुपकरांच्या विरोधात मूठ बांधली. त्यांच्यावर दाखल गुन्हे पाहता प्रशासनाने त्यांना तडीपार केले. मध्यंतरी आंदोलनातून दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमुळे त्यांना सातत्याने कोर्टाची पायरी चढावी

लागली आणि कोर्टात त्यांची ॲड. शर्वरी सावजी यांच्याशी ओळख झाली. एकमेकांचे विचार, स्वभाव आणि मने जुळली. आंदोलनातून बहरलेलं हे प्रेम लग्नाच्या बंधनात अडकले. अगदी साध्या पद्धतीने शहीद भगतसिंह यांच्या फोटोला हार घालून त्यांनी लग्न केले. लग्नानंतर नवे जोडपे फिरायला जाण्याची पद्धत आहे, परंतु हा बहाद्दर तब्बल २७ शेतकरी आत्महत्या झालेल्या मेळघाटातील बोथबोडन या गावात पत्नीला घेऊन गेला. काही दिवस येथे घालवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत राहून त्यांच्या व्यथा समजून घेत त्यांना आधार आणि दिलासा देण्याचे काम या नवदाम्पत्याने केले, हे विशेष.

तडीपारीनंतर पुन्हा धडाडली तोफ..

तडीपारीमुळे आता रविकांत तुपकर नावाचे वादळ शांत होईल, असे अनेकांना वाटले होते. परंतु तडीपारीनंतर तुपकर जिल्ह्यात परतले आणि त्यांनी पुन्हा नव्या दमाने आंदोलनाला सुरुवात केली. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलने त्यांनी केली. बुलडाणा जिल्हाच नव्हे तर पश्चिम विदर्भ, हळू हळू संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही तुपकरांची तोफ धडाडू लागली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनात आणि लढ्यात रविकांत तुपकर अग्रस्थानीच होते आणि आजही आहेत. तुपकरांचं लग्न जसं आंदोलनातून बहरलेल्या प्रेमाचं फलित होतं तसच अपत्यप्राप्तीलाही आंदोलनाचीच किनार आहे. अपत्यप्राप्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा, जिव्हाळ्याचा क्षण. त्यात पहिले अपत्य म्हटल्यावर प्रत्येकजण अशा वेळी पत्नीला आधार देण्यासह पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी जातीने दवाखान्यात हजर असतो. परंतु रविकांत तुपकर याला अपवाद ठरले. म्हणूनच त्यांना आंदोलन सम्राट, आंदोलनाचा धगधगता निखारा म्हणत असावे.

दीड महिन्यानंतर पाहिले मुलीला..

नोव्हेंबर २०११ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढण्यात आली होती. राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. इकडे तुपकरांच्या पत्नी ॲड. शर्वरी यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. तुपकरांना निरोप पाठविला. परंतु आंदोलन आणि पदयात्रा सोडून येणार नाही, असे तुपकरांनी ठामपणे सांगितले. ३ नोव्हेंबर २०११ रोजी तुपकरांना पहिले अपत्य यज्ञजा हे कन्यारत्न प्राप्त झाले. तेव्हा तुपकर पंढरपूर ते बारामती पदयात्रेत होते. शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून मिळाला आणि आंदोलन यशस्वी झाल्यानंतर तुपकर बुलडाण्याला घरी परतले तेव्हा त्यांची कन्या सुमारे दीड महिन्याची झाली होती. आपल्या पहिल्या अपत्याला दीड महिन्यानंतर पाहण्याची संधी तुपकरांना मिळाली. अर्थात ही संधी ते अपत्यप्राप्तीच्या दिवशीच घेऊ शकले असते. परंतु 'आधी लग्न कोंढाण्याचे' ही शिवरायांची शिकवण तुपकरांच्या रक्तात भिनलेली आहे.

पहिले मानधन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला..

२०१४ च्या निवडणुकीनंतर देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना तेव्हा भाजप-सेना युतीच्या सोबत होती. त्यानंतर युती सरकारने स्वाभिमानीला सत्तेचं पद अर्थात महामंडळ देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी राजू शेट्टी यांना विचारणा केली असता शेतकरी चळवळ, संघटना आणि शेतकरी आंदोलनासाठी घर, परिवाराचं काय पण जिवाची देखील बाजी लावणाऱ्या रविकांत तुपकर यांचे नाव त्यांनी पुढे केले आणि सत्तेचा पहिला वाटा तुपकरांच्या नावे केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणारा हा शेतकरी पुत्र लाल दिव्याच्या गाडीत बसला. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष म्हणून रविकांत तुपकर हे नाव शासनदरबारी नोंदविले गेले. तुपकरांचा लाल दिवा जेव्हा पहिल्यांदा जिल्ह्यात दाखल झाला तेव्हा तो सरळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या झोपडीसमोर थांबला. हे पद, हा सत्तेचा वाटा आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला अर्पण करतो असे सांगत वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचे पहिले आणि शेवटचेही (अर्थात सर्वच) मानधन त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिले.

आत्मक्लेश पदयात्रा..

परंतु हा लाल दिवा फार काळ त्यांच्याकडे टिकला नाही. युती शासन शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत नसून शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याने राजू शेट्टी यांनी शासनाच्या विरोधात आवाज उठविला आणि तेव्हा लाल दिव्याला लाथ मारून हा शेतकरी नेता आंदोलनात सामील झाला. सत्तेचा मोह भल्याभल्यांना सोडवत नाही. पदासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते. परंतु तुपकरांनी शेतकरी हितासाठी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि खरा शेतकरी लढवय्या असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले. या काळात त्यांना लाल दिवा मिळाला, लाल दिवा गेला, सत्तासंघर्ष, शेतकरी आंदोलने हे सर्व घडत असताना एक आनंदाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे दुसरे अपत्य, पुत्रप्राप्ती. पहिली मुलगी झाली तेव्हा तुपकर पंढरपूर ते बारामती पदयात्रेत होते. किमान दुसऱ्या अपत्यप्राप्तीच्या वेळी तरी ते घरी असतील, पत्नीसोबत असतील किंवा असायलाच हवे होते. परंतु नाही. २३ मे २०१७ रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा हा अवलिया माणूस पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत होता.

जाहीर कार्यक्रमात ठेवले मुलाचे नाव..

कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी युती शासनाच्या विरोधात आंदोलन पेटले होते आणि याच आंदोलनादरम्यान तुपकरांना पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलीच्या वेळी दीड महिन्यांनी तुपकर घरी परतले होते. मुलाच्या वेळी त्याहीपेक्षा उशीर झाला, हा अवलिया माणूस तेव्हाही आंदोलनातच होता. मुलाचे नाव ठेवायचा समारंभ आज करू, उद्या करू असे म्हणता म्हणता अखेर दीड वर्षाने देवव्रत हे नाव ठेवण्यात आले आणि तेदेखील एका जाहीर सभेत. शेतकरीहितासाठी राजीनामा देऊन सत्तेच्या पदाला लाथ मारणाऱ्या या नेत्याचा गुंज येथे सहपरिवार सत्कार आयोजित करण्यात आला होता, याच समारंभात झालेल्या जाहीर सभेत मुलाचे नाव ठेवण्यात आले, हे विशेष.

सरकारने घेतली धास्ती..

शेतकरी आंदोलन आणि रविकांत तुपकर हे समीकरण आजतागायत कायम आहे. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पक्ष, संघटना आणि राजकारण बाजूला ठेवून रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले आहे. बुलडाण्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ३१ ऑक्टोबर रोजी भव्य एल्गार मोर्चा निघाला होता. त्याचवेळी त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाचा झंझावाती दौरा करुन रणशिंग फुंकले तर आता १७ नोव्हेंबरपासून राज्याची उपराजधानी नागपूर येथे तुपकरांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनाची धास्ती घेत सरकारने त्यांना त्याच रात्री उचलले आणि बुलडाण्याला रवाना केले. तेथेही ते स्वस्थ बसले नाही, तर दुसऱ्या दिवशी १८ नोव्हेंबरला त्यांनी घरासमोरच अन्नत्याग आंदोलन कायम ठेवले. तिसऱ्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबरला त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर कुठे सरकारने त्यांची दखल घेतली. सरकारच्यावतीने अन्न व औषध प्रशासन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी त्यांचे उपोषण सोडविले. आज त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चेसाठी बोलावले आहे. ही चर्चा सकारात्मक होऊन कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळेल, ही आशा रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांना आहे.

Related Stories

No stories found.