सत्ता बदलल्याने सेटिंग फिसकटली, काहींना फुटला दरदरून घाम, तर काहींना गुदगुल्या...

३१ मे पर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. परंतु या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ३० जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली होती.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

नागपूर : अवघ्या काही दिवसांच्या घडामोडींतच राज्यातील सत्ता बदलली. त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला सुरुवात झाली आहे. मागील सरकारमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी सेटिंग लावली होती. पण सत्तांतरानंतर सेटिंग फिसकटली. परिणामी काहींना दरदरून घाम फुटला आहे, तर काहींना गुदगुल्या होत आहेत.

सत्ता बदलल्याने सर्वाधिक परिणाम प्रशासनावर होणार असल्याचे सांगण्यात येते. मंत्रिमंडळाचे गठन होताच अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. या बदल्यावर नवीन सरकारची (Eknath Shinde Government) छाप असणार असेल. ३१ मे पर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. परंतु या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ३० जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली होती. विशेष म्हणजे बदल्यांसाठी होत असलेल्या घोडाबाजाराच्या आरोपावरूनच महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) एका मंत्र्याला मंत्री पद गमवावे लागले होते. त्यामुळेच बदल्यांना महिन्याभराची स्थगिती देण्यात आल्याची चर्चा होती.

एका मंत्र्यानेही यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची चर्चा आहे. बदल्यासाठी अनेकांनी सेटिंग केली होती. सोयीचे ठिकाण मिळण्यासाठी काहींनी मंत्रालय गाठले, काहींनी मंत्रालयात प्रवेश असलेले पक्षातील कार्यकर्ते तर काहींनी ओळखीच्या माध्यमातून मंत्री, सचिवांची भेटी गाठी घेतल्या. त्यांच्यापर्यंत ‘मेसेज’ पोहोचविला. त्यासाठी आवश्यक तडजोड करण्याची तयारी दर्शविली. काहींनी पहिल्या टप्प्यातील तडजोडीही पूर्ण केल्याचे समजते. अधिक वजन असलेल्यांना प्राधान्य मिळणार होते. परंतु यामुळे त्याच जागेसाठी डोळा ठेवून असलेल्यांचा हिरमोड झाला.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बदलीस स्थगिती दिल्याने काहींची धाकधूक वाढली होती. बदल्यांवरील स्थगिती उठण्यापूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि सत्ता बदल झाला. पूर्वीच्या सरकारकडून करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्याचे स्पष्ट संकेत नवीन एकनाथ शिंदे सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची सेटिंग बिघडल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. केलेली तडजोडही वाया गेल्याने अनेकांना घाम फुटला आहे. तर ज्यांनी तडजोड केली नाही, त्यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आहे.

Uddhav Thackeray
video : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे रात्रीस खेळ चाले

ओएसडीसाठी फिल्डिंग..

सत्तांतरणामुळे जुन्या मंत्र्यांचे पद गेले. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले ओएसडी परत आपल्या मूळ विभागात रुजू झाले. नवीन येणाऱ्या मंत्र्यांकडे ओएसडी म्हणून वर्णी लावण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. सोयीचे पद न मिळाल्यास ओएसडी म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in