Walse Patil : केंद्र सरकारने भगतसिंह कोश्‍यारींवर योग्य ती कारवाई करावी...

निकाल जेव्हाही येईल, तेव्हा अनिल देशमुख हे निर्दोष मुक्त होतील, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSarkarnama

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ज्या पद्धतीने या प्रकरणात ओढण्यात आले, ते अतिशय वाईट आहे. या प्रकरणाशी त्यांचा काही एक संबंध नसताना केवळ राजकारणाचा भाग म्हणून त्यांना गोवण्यात आले आहे. न्यायालयाचा आदेश मी पाहिलेला नाही. त्यांना जामीन मिळालेला आहे. पण लगेच १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल जेव्हाही येईल, तेव्हा अनिल देशमुख हे निर्दोष मुक्त होतील, असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्यूअल रॅलीसाठी वळसे पाटील (Dilip Walse Patil) आज नागपुरात (Nagpur) आले होते, त्यावेळी विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला अटक झाली होती. एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. आता तरी त्यांची सुटका होईल, याची आम्ही सर्व वाट बघत आहोत. जामीन मिळणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. पण गेल्या काही काळापासून लोकांना अशा प्रकरणात अडकवून ठेवले जात आहे, त्यावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे आणि अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) आपली बाजू न्यायालयात मांडल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आलेला आहे, असे वळसे पाटलांनी सांगितले.

आज जामीन जरी झालेला असला, तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कायद्याच्या आधारे जर बघितले तर एका गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार करणे, चुकीचे आहे. अनिल देशमुख यांचा राजकीय सूड घेण्याचा प्रकार या प्रकरणात झालेला आहे. अन्याय करण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे. पण ते निश्‍चितपणे या प्रकरणातून बाहेर पडतील, निर्दोष मुक्त होतील, असा विश्‍वास वळसे पाटलांनी व्यक्त केला.

राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याबद्दल विचारले असता, वळसे पाटील म्हणाले, राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी काय पत्र लिहिले आणि काय खुलासा केला, याबद्दल मला सध्या काही माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आदर प्रत्येक माणसाच्या मनात आहे. त्यांच्याबद्दल कुणाकडूनही अशा प्रकारचं वक्तव्य होऊ नये. कोश्‍यारींच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांच्या भावना तीव्र आहेत, लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने योग्य ती कारवाई या प्रकरणात केली पाहिजे, अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे.

Dilip Walse Patil
NCP Vs BJP : दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज्यात एक हाती कारभार सुरू आहे

काही राजकीय पक्ष आणि नेते करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारतात आणि शॉर्टकटचे राजकारण करतात, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपुरात समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी केले होते. याबाबत विचारले असता, ते प्रत्यक्षपणे कुणावर बोलले, हे माहिती नाही. त्यामुळे येवढ्याच वाक्यावरून काही निष्कर्ष काढता येणार नाही, असे ते म्हणाले. ग्रामपंचायतीमध्ये आमच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही, तर निधी देणार नाही, अशी धमकी राणे यांनी दिली आहे. त्यावर त्यांची जी प्रवृत्ती आहे, त्यानुसार ते बोलत असतात, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com