भंडाऱ्यात वाढली ‘दादां’ची ‘भाऊ’गर्दी, शहराचा जीव गुदमरतोय...

तुमचा शौक असला तरी आमचा जीव गुदमरतोय, असा आवाज भंडारा शहराच्या Bhandara City चौकाचौकांतून येऊ लागला आहे.
भंडाऱ्यात वाढली ‘दादां’ची ‘भाऊ’गर्दी, शहराचा जीव गुदमरतोय...
Bhandara City BannerSarkarnama

भंडारा : भंडारा शहराचा जीव गुदमरतोय...! ऐकून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. भंडारा शहरात ‘दादां’ची ‘भाऊ’गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चौकाचौकांत शुभेच्छा फलकांचा भडिमार केल्याने शहराचे विद्रुपिकरण सुरु झाले आहे. परिणामी शहराचा जीव गुदमरतोय.

गल्ली-बोळातील मिसुरडेही न फुटलेली पोरं आपल्या मोठेपणा मिरविण्यासाठी स्वत:ला भाई अन भाऊ म्हणवून घेत लोकांच्या उरावर उगीच शुभेच्छा, अभिनंदन व स्वागताचा भडिमार करीत असल्याचे चित्र दिसते आहे. तुमचा शौक असला तरी आमचा जीव गुदमरतोय, असा आवाज भंडारा शहराच्या चौकाचौकांतून येऊ लागला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेकांना सार्वजनिकरित्या फ्लैक्स, बैनर झळकवता आले नव्हते. यंदा मात्र सर्वांनी नामी संधी साधुन घेतली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्व गल्ली बोळातील नेत्यांचे जनतेच्या प्रति प्रेम उफाळून आले आहे. त्यांमुळे ताई, दादा, अक्का, भाऊ, साहेब, पाटील राव-साव सारे एकजात झाडून सक्रिय झाले आहेत. गणेशोत्सवापासुन सुरु झालेला हा प्रकार दीवाळी व नववर्षापर्यंत राहणार आहे. त्यांमुळे भंडारा शहरातील कलेक्टर चौक, जिल्हा परिषद चौक, मोठा बाजार, लाल बहादुर शास्त्री चौक, गांधी चौक या भागांत फलक लोंबकळताना दिसत आहेत. या फलकांमुळे वाहतुकीला व्यस्तय येत असून मोठ्या अपघातास निमंत्रण मिळत आहे. आता या विषयात प्रकरणी भंडारावासीयांनी कंबर कसली असून नगर परिषदेने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Bhandara City Banner
केंद्राच्या सूचनांकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष, त्यामुळेच घडतात भंडारा, नगरसारख्या घटना…

शहरात दरवर्षी गणोशोत्सवानंतर हीच परिस्थिती असते. याबाबत आम्ही नगर परिषद प्रशासनाला वारंवार विनंती करतो, अर्ज देतो. पण ढिम्म प्रशासन जागचे हलायलाही तयार नसते. काही बॅनर अशा ठिकाणी लावलेले आहेत की, ज्यामुळे केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो. पण कारवाई मात्र शून्य. अपघातात बळी गेल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल शशीकांत भोयर, संजय मते यांच्यासह शहरातील नागरिकांनी केला आहे.

भंडारा नगर परिषदेचे शहरात अधिकृत होर्डिंग आहेत. त्याचा कर नगर परिषदेला नियमित मिळत असतो. मात्र बाकी सर्व वाढदिवस, स्वागत, अभिनंदनाचे फ्लैक्स, बैनर हे अनधिकृत असून त्या लोकांनी नगर परिषदेकडून कुठलीही परवानगी घेतलेली नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर आता अनधिकृत पोस्टर फ्लैक्स, बॅनरवर आता नगर परिषद प्रशासन कारवाईचा बडगा उगारणार आहे.

भागवत काळे, कर अधीक्षक.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in