Narendra Modi : गुरू-शिष्य परंपरा विज्ञानाच्या क्षेत्रात सफलतेचा मंत्र होऊ शकतो...

Nagpur : भविष्यकालीन आव्हानांसाठी आपण सज्ज असायला हवे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Indian Science Congress Nagpur News : भारत सध्या क्वांटम कंप्युटींग, रसायने आणि पदार्थ विज्ञानावर भर देत आहे. भारतीय युवकांनी क्वांटम तंत्रज्ञानावरील संशोधनात सहभाग नोंदवला पाहिजे. देश सध्या सेमिकंडक्टर चीपसाठी प्रयत्न करत असून, आत्ताच सेमिकंडक्टर उद्योगातील भविष्यकालीन आव्हानांसाठी आपण सज्ज असायला हवे, असे झाले तर भारत इंडस्ट्री ४.० चे नेतृत्त्व करू शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

आजपासून नागपुरात (Nagpur) सुरू झालेल्या १०८व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) सायन्स आणि टेक्नॉलॉजी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, विजयालक्ष्मी सक्सेना आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले, व्यावहारिक स्तरावर शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरण एकमेकांशी जोडले आहे. केवळ विज्ञानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करून चालणार नाही, तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमीकरण करता येईल. शास्त्रज्ञांच्या ज्ञानाला व्यावहारिक उपयोगिता मिळाली की लोकांचं जगणं सुसह्य होतं. म्हणून प्रयोगशाळेतील विज्ञान प्रत्यक्ष जमिनीवर उतरायला हवे.

मानवतेवर सध्या वैश्विक साथींचे संकट असून भारतही लसीच्या संशोधन आणि विकासाला चालना देत आहे. आजारांचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयांनी सोबत काम करायला हवे. स्टार्टअप्सने शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे सहकार्य घ्यायला हवे. प्रयोगापासून अनुभवापर्यंतचा प्रवास जेव्हा गाठला जातो, ही बाब युवकांना प्रभावित करते. सायन्सच्या माध्यमातून जगाला प्रभावित केले जाऊ शकते. अशा युवकांसाठी इन्स्टिट्यूशनची गरज आहे. त्यांना नवीन संधी देण्याचीही गरज आहे. येथे उपस्थित वैज्ञानिकांनी इन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क करावे. टॅलेंट हंटच्या माध्यमातून जिज्ञासू मुलांचा शोध घेतला जाऊ शकतो. वरिष्ठ वैज्ञानिक त्यांची मदत करू शकतात.

क्रीडा क्षेत्रातही भारत प्रगती करीत आहे. प्रतिभा विकसीत करण्यासाठी फ्रेमवर्क मजबूत केले. गुरुशिष्य परंपरेचे अस्तित्व प्रभावी आहे. नवीन प्रतिभांना ओळखून त्यांना पुढे नेले जात आहे. शिष्याच्या यशात गुरू आपले यश बघतो. हा मूलमंत्र, ही परंपरा विज्ञानाच्या क्षेत्रात सफलतेचा मंत्र होऊ शकतो. गरजांच्या पूर्ततेसाठी वैज्ञानिक समुदायाचा प्रामाणिकपणा असला पाहिजे. जगाची १७ ते १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे. भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून जगातील इतर देशांना मदत होईल, असे कार्य आपल्याला करता येणार आहे. संपूर्ण मानवतेवर त्याचा प्रभाव होईल. ऊर्जा क्षेत्रामध्ये भारताची गरज वाढणार आहे. वैज्ञानिकांनी यात काम केल्यास देशाला मोठा फायदा होणार असल्याचे मोदींनी सांगितले.

Narendra Modi
PM Narendra Modi: देशातील तरुणांना जातीपाती आणि परिवाराचं राजकारण नकोय : नरेंद्र मोदी

वैज्ञानिक आणि उद्योग यांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. नवनवीन आजारांचे संकट येत आहे. लशी तयार करण्यासाठी संशोधन आणि विकासाला चालना द्यावी लागेल. भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तींसाठी आपण सदैव तयार राहतो. तसेच आजार शोधून ते निपटण्यासाठीचे उपाय करावे लागतील. वेगवेगळ्या मंत्रालयांनी एकत्र मिळून काम करावे लागणार आहे. वेस्ट मॅनेजमेंटच्या क्षेत्रातही आपल्याला संधी आहे. इलेक्ट्रॉनिक, बायोमेडीकल, कृषी क्षेत्रातील वेस्टमध्ये विस्तार होतो आहे. गेल्या वर्षी सरकारने बजेटमध्ये सर्क्यूलर इकानॉमीवर जोर दिला होता. अर्थव्यवस्थेला मजबूत करायचे आहे, तर मेटल आणि प्लॅस्टिक स्क्रॅपचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. त्यासाठी विज्ञानाची मोठी मदत होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in