वयाच्या सोळाव्या वर्षी स्वातंत्र्यासाठी झुंजले सुखदेवराव पोटदुखे !

धनजीभाई ठक्कर मुंबई (Mumbai) येथून वाडेगावला आले. संपूर्ण बाळापूर तालुक्यात स्वातंत्र्य सैनिकांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी देशभक्त धनजीभाई ठक्कर यांचा सिंहाचा वाटा राहिला.
Mumbai
Mumbai Sarkarnama

राजकुमार चिंचोळकर

वाडेगाव (बाळापूर, जि. अकोला) : जर खरी देशसेवा करायची असेल तर खेड्याकडे वळा व जनजागृती करा, या राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या उपदेशाला प्रेरित होऊन गुजराती (Gujrat) गृहस्थ देशभक्त धनजीभाई ठक्कर मुंबई (Mumbai) येथून वाडेगावला आले. संपूर्ण बाळापूर तालुक्यात स्वातंत्र्य सैनिकांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी देशभक्त धनजीभाई ठक्कर यांचा सिंहाचा वाटा राहिला.

धनजीभाई ठक्कर मार्गदर्शनात स्वतंत्रता लढ्यात वाडेगाव व बाळापूर तालुक्यातील सर्वच स्वातंत्र्य सैनिकांनी मोठे योगदान दिले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना कारावाससुध्दा भोगावा लागला होता. त्यांच्यापैकीच एक असलेले वाडेगाव येथील सुखदेवराव पोटदुखे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. इंग्रज राजवटीच्या विरोधात प्रखर लढा देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये पोटदुखे यांचे नाव आजही सन्माने घेतले जाते.

१३ ऑगस्ट १९२५ रोजी त्यांचा जन्म झाला. सातवीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात देशभक्तीचे बीज अंकुरले. ते त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी ब्रिटिश राजवटीला जेरीस आणण्याचे प्रयत्न सहकारी मित्रांच्या मदतीने सुरू केले. ते सहकारी मित्रांपेक्षा वयाने सर्वात लहान. कोणत्याही सरकारी कायद्याची पर्वा न करता सुखदेवराव पोटदुखे यांनी सहकाऱ्यांसोबत त्या काळी दप्तर जाळणे, बुलेटिन वाटणे, भूमिगतांना भाकरी पोहचविणे, तसेच अंगरक्षक असतानाही अकोला येथून येणाऱ्या पोस्टची थैली पोस्टमन जवळून हिसकावून घेतली होती.

अंगरक्षकाकडे शस्त्र असतानाही त्यांच्यासोबत पोटदुखे यांनी दोन हात केले. त्यावेळी सुखदेवराव पोटदुखे यांनी सहकारी मित्रांसह तोंडाला नकाब बांधून ही कामगिरी फते केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोटदुखे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून असह्य मारहाण करण्यात आली. त्यांना जवळपास पंधरा दिवस बाळापूरच्या ठाण्यात व नंतर अकोला कारागृहात पाठवून दीड महिन्यांनी त्यांच्यावर खटला भरला. यामध्ये सुखदेवराव पोटदुखे यांना पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. परंतु, अपील केल्यानंतर तीन वर्षाच्या शिक्षेत रूपांतर झाले.

Mumbai
Ashish Shelar : मुंबई जिंकून देण्याची जबाबदारी शेलारमामांवर...

विशेष न्यायाधीश नांदे यांनी या खटल्याचा निकाल दिला होता. सरकार विरोधात सुखदेवराव पोटदुखे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाजूने बॅरिस्टर फडके, ॲड. भोजने, ॲड, अवस्थी यांनी बाजू मांडली. सुखदेवराव पोटदुखे यांना बालगुन्हेगार म्हणून अकोला येथील कारागृहात कारावास भोगावा लागला. त्यांच्या सहकाऱ्यांना सुध्दा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट १९७२ रोजी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ताम्रपट देऊन सन्मानित केले आहे.

विदर्भाची बारडोली वाडेगाव

महात्मा गांधी यांचा विदर्भ दौरा झाला असताना १८ नोव्हेंबर १९३३ रोजी वाडेगाव येथील निर्गुणा नदी पात्रांमध्ये देशभक्त धनजीभाई ठक्कर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संबोधित केले होते. सभेला अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यात वाडेगाव येथील नागरिकांचे मोठ्या संख्येने योगदान बघता, वाडेगावला विदर्भाची बारडोली म्हणून महात्मा गांधी यांनी संबोधित केले होते.तेव्हापासून विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वाडेगाव विदर्भाची बारडोली म्हणून ओळखले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com