
NCP News : छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर, यावरून राज्यात वाद पेटला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी, ३० डिसेंबरला संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक संबोधले होते. त्यानंतर शनिवार आणि रविवार, हे दोन दिवस काहीच झाले नाही. मात्र सोमवारी भाजपने अजित पवारांच्या विरोधात राज्यभर रान पेटवले.
सर्वत्र अजित पवारांचा (Ajit Pawar) निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यापासून, पुतळे, पोस्टर जाळणे आणि पोस्टरला चपला मारण्यापर्यंतचा कार्यक्रम भाजपचे (BJP) नेते, कार्यकर्त्यांनी राबविला. दरम्यान ज्यांना संभाजी महाराज स्वराज्य रक्षक वाटतात, त्यांनी स्वराज्य रक्ष म्हणा आणि ज्यांना ते धर्मवीर वाटतात, त्यांनी धर्मवीर म्हणा. या विषयात वाद वाढवण्याचे काही कारण नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. यावेळेसही अजित दादा शांत होते. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान काल रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी ‘स्व. आनंद दिघे यांना धर्मवीर मानणाऱ्या बुद्धिवादी लोकांनी छत्रपती संभाजी राजे यांना फक्त धर्मवीर म्हणून संबोधीत करून शंभू राजे यांचा उल्लेख करून आनंद दिघे यांचे सोबत तुलना करून संभाजी राजे यांचा अपमान करू नये’, असे ट्विट केले होते. विरोधात आंदोलन पेटल्यानंतर अजित पवार आज मुंबईत पत्रकारांसमोर आले आणि त्यांची भूमिका मांडली. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणेच योग्य आहे, असे माझे ठाम मत आहे, असे त्यांनी आज निक्षून सांगितले.
प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी काल रात्री संभाजी राजेंना धर्मवीर संबोधणाऱ्यांचा समाचार ट्विटच्या माध्यमातून घेतला होता. आज पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, मी बेवसाईटवर धर्मवीर उपाधी कुणा-कुणाला आहे, हे बघत होतो. तर सात ते आठ लोकांनी स्वतःला धर्मवीर उपाधी लावली आहे. काहींचे तर चित्रपट निघाले आहे आणि आता तर धर्मवीर भाग-२ सुद्धा निघतो आहे. छत्रपती संभाजी महाराजांना जर तुम्ही धर्मवीर म्हणत असाल, तर दुसरी व्यक्ती तशी होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज दुसरे कुणी होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे संभाजी महाराजांसारखी दुसरी व्यक्ती असूच शकत नाही. या वक्तव्याने अजित दादांना कुंटे पाटलांचे ट्विट खरे ठरवले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.