गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी टाकलेल्या पत्रात एसटीचा उल्लेख...

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सालेकसा येथे नक्षलवाद्यांनी सालेकसा पोलिस स्टेशनच्या १ किलोमीटर अंतरावर शारदा मंदिराच्या परिसरात बॅनर आणि पोस्टर लावले.
Gondia Letter Police
Gondia Letter PoliceSarkarnama

भंडारा : गोंदिया (gondia) जिल्ह्यातील सालेकसा येथे नक्षलवाद्यांनी सालेकसा पोलिस (Police) स्टेशनच्या १ किलोमीटर अंतरावर सालेकसा - दरेकसा या रस्त्यावर शारदा मंदिराच्या परिसरात बॅनर आणि पोस्टर लावले. याशिवाय रस्त्यावर त्यांनी पत्रकेही फेकली. यानंतर जिल्ह्यासह सर्वत्र खळबळ उडाली. या पत्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

पत्रामध्ये नक्षलवाद्यांनी (Naxalite) एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. माओवादी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे आणि महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करते, असे म्हटलेले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नक्षलवाद्यांनी ताशेरे ओढले आहेत. एकही राजकीय पुढारी सामान्य जनतेच्या हिताचा विचार करीत नाही, तर उद्योगपतींची घरे भरण्यात राजकारण्यांना रस असल्याचा आरोपही नक्षल्यांनी केलेला आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन पत्रकांमध्ये करण्यात आले आहे. सालेकसा हा तालुका नक्षलग्रस्त असून याठिकाणी अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. आज बॅनर, पोस्टर्स आणि पत्रके आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

काय लिहिलंय पत्रात...

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुद्दामहून उशीर करीत आहे. परिवहनमंत्री अनिल परब एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याबाबत बोलतात आणि दुसरीकडे संप मोडीत काढण्यासाठी षड्यंत्र रचतात, असा आरोप नक्षल्यांनी पत्रकात केला आहे. कर्मचाऱ्यांना मुदत दिली गेली आणि त्या मुदतीत कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि कारवाई करून निलंबित केले जात आहे. परत आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सांगून न आलेल्यांना धमक्या दिल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ, दर महिन्याच्या ८ तारखेला वेतन देण्याचे आमिष दाखविले जात आहे. त्रिस्तरीय समिती तयार करून १२ आठवड्यात अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्या आधारावर कर्मचाऱ्यांना भ्रमित करण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सरकारकडून प्रशासकीय तंत्राचा वापर करून जनतेला सुविधा उपलब्ध करून न देता सोपी कामे अवघड केली जात असल्याचाही आरोप नक्षल्यांनी केला आहे.

Gondia Letter Police
 नोटबंदीनंतर नक्षलवाद वाढताना दिसतोय :  पृथ्वीराज चव्हाण 

एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय गुजर यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी लाखो रुपयांचे आमिष दाखवून संप संपल्याची घोषणा करवून घेतली. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि केलेले निलंबन मागे घेऊन सेवा सुरळीत करण्याबाबतही सांगितले जात आहे. पण खरे पाहता जोपर्यंत राज्य सरकार एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणार नाही, तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही, असे नक्षल्यांनी निक्षून सांगितले आहे. हे सांगताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नक्षल्यांनी नाटक करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ऐन लढा सुरू असताना संपाला दिलेले समर्थन मागे घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्व राजकीय पक्षांचे लोक सारखेच असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. आमची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडची विशेष समिती एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन करीत आहे. त्यांच्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे. केवळ उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करणाऱ्या या सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही पत्रकात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com