MLA Pratibha Dhanorkar
MLA Pratibha DhanorkarSarkarnama

जिजाऊ ते सैराट अन् सैराट ते झुंड, महिलादिनी गाजले आमदार धानोरकरांचे भाषण...

महिला आमदारांना आज विधानसभेत बोलायची संधी देण्यात आली. यावेळी जिजाऊ ते सैराटचा उल्लेख करीत आमदार धानोरकरांनी (Pratibha Dhanorkar) लक्ष वेधून सभागृह दणाणून सोडले.

चंद्रपूर : शिवबांना (Chhatrapati Shivaji Maharaj) घडविणाऱ्या जिजाऊ, आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीत प्रवासात भक्कमपणे पाठीशी उभी राहणारी रमाई, या महिलांनी महाराष्ट्र (Maharashtra) घडविला. परंतु आजच्या काळात समाजाबाहेर विवाह केला म्हणून मुलींच्या हत्या होतात. नागराज मंजुळे यांच्या सैराट, फॅन्ड्री चित्रपटातील कथानक जरी काल्पनिक असले तरी अशा अनेक सत्यकथा आजही आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. आजच्या काळात महिला, मुलींबाबतची समाजाची ही वागणूक आत्मचिंतन करायला लावणारी आहे. महिला लोकप्रतिनिधी म्हणून मला याची खंत आहे, अशा भावना वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत मांडल्या.

महिला दिनाच्या (Women's Day) निमित्ताने महिला आमदारांना आज विधानसभेत बोलायची संधी देण्यात आली. यावेळी जिजाऊ ते सैराटचा उल्लेख करीत आमदार धानोरकरांनी (Pratibha Dhanorkar) लक्ष वेधून सभागृह दणाणून सोडले. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेत अनेक माता-भगिनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यक्तिगत पातळीवरील अडचणींचा सामना करून आपल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राज्याच्या विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. जगाच्या पाठीवर पाठीवर आज आमच्या माता भगिनी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. एवढेच नव्हे तर ज्या क्षेत्रामध्ये महिलांना बंदी होती. ती महिलांसाठी उघडल्यानंतर तिथेही त्यांनी सर्वोच्च स्थान गाठले. नौदल. वायुदल पासून बस ते आटो चालक आणि अर्थकारणापासून ते शेती पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये आमच्या माता भगिनींनी स्वतःला सिद्ध केलेले आहे. एकीकडे अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. ज्याच्यामुळे महिलांना बरोबरीने संधी मिळत असल्याचे चित्र निर्माण होत आहेत. मात्र दुसरीकडे अशा काही गोष्टी सुद्धा घडत आहेत की, ज्यामुळे आम्ही पुढे जात आहोत की मागे येत, यावर आत्मचिंतन करण्याची आम्हाला गरज आहे, याकडे आमदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

शेकडो वर्षांपूर्वी शिक्षणामध्ये समाज मागासलेला असतानाही त्यावेळी या थोर महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्यांच्या पुढ्यात अनेकांनी अडचणी उभ्या केल्या. परंतु त्याचवेळी समाजातील अनेक चांगली माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ज्या काळात समाज शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला होता, रूढीवादी होता. अशा वेळी या महिलांना संधी मिळाली. मात्र आज आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले असताना. स्वतः आधुनिक समाजाचे नागरिक म्हणत असताना एखाद्या मुलीने स्वतःच्या मर्जीने आयुष्याचा जोडीदार निवडला म्हणून तिची हत्या केली जाते. बलात्कार झालेल्या मुलींनाच राज्यकर्ते दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात. न्याय मागण्यासाठी गेलेल्या अशा आमच्या माता भगिनींना प्रशासनामध्ये अनेक वेळा चांगली वागणूक मिळत नाही. अलीकडे महाराष्ट्रात संवैधानिक पदावर बसलेल्या काही व्यक्तींनी थेट राज्याच्या आद्यशिक्षीकेबद्दलच टिंगल टवाळकी करणारे, अपमान करणारे बेजबाबदार वक्तव्य केले.

MLA Pratibha Dhanorkar
आता आणखी काय-काय विकणार आहात : आमदार प्रतिभा धानोरकर

आधुनिक काळात आपण शिक्षणात पुढारलेले असताना आमच्या डोक्यातील घाण कायम असल्याचे अनेकदा सिद्ध होते, असा टोलाही त्यांनी राज्यपालांचे नाव न घेता हाणला. आजही आपण आपल्या कुटुंबातील महिलांना दुय्यम वागणूक देतो. एक व्यक्ती म्हणून त्यांना स्वातंत्र्य द्यायला तयार नाही. सामाजिक पातळीवर अशा अनेक उणिवा अजूनही शिल्लक आहेत. किंबहुना आधुनिक काळातील समाजामध्ये परंपरेच्या नावाखाली या उणिवा सबळ करण्याचा प्रयत्न एका वर्गाकडून सुरू आहे. एक व्यक्ती म्हणून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने, व्यवस्थेने, धोरणकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी स्वतः मध्ये निर्माण केला. हा दृष्टिकोन ते तयार करू शकत नसेल तर सर्व माता-भगिनींनी एकत्र येत त्यासाठी लढावे लागेल आणि मा. जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नातील देश घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे आमदार धानोरकर म्हणाल्या.

सैराट, फॅन्ड्री आणि झुंड...

समाजामध्ये दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्यांच्या लोकांच्या भावनांची दखल घेऊन कटू वास्तव समाजापुढे ठेवण्याचे काम हल्ली एक प्रतिभावंत दिग्दर्शक नागराज मंजुळे करीत आहे फॅन्ड्री, सैराट आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या झुंड चित्रपटातून त्यांनी भितींपलीकडच्या माणसांचे अस्वस्थ करणारे जग आपल्या समाजासमोर आणले. नागराज मंजुळे यांचे सैराट चित्रपटातील कथानक जरी काल्पनिक असले तरी अशा अनेक सत्यकथा आपल्या आजूबाजूला आजही घडताना दिसतात. खचितच आधुनिक काळामध्ये महिला मुलींच्या बाबतीत समाजाची ही वागणूक म्हणजे अत्यंत शरमेची बाब आहे, असे आमदार धानोरकर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com