सोनिया गांधी मला नावाने ओळखतात, यापेक्षा मोठं काही नाही...

आम्ही इकडे तिकडे पळणारे लोक नाही. झिजून जाईन, मरून जाईन, पण कॉंग्रेस सोडून जाणार नाही, असे कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) म्हणाले.
सोनिया गांधी मला नावाने ओळखतात, यापेक्षा मोठं काही नाही...
Balu DhanorkarSarkarnama

नागपूर : मला कॉंग्रेसमध्ये येऊन केवळ तीन वर्ष झाले. पण तुम्ही काळजी करू नका आम्ही इकडे तिकडे पळणारे लोक नाही. झिजून जाईन, मरून जाईन, पण कॉंग्रेस सोडून जाणार नाही, असे कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) म्हणाले.

चंद्रपूर (Chandrapur) येथे काॅंग्रेसच्या (Congress) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार देवराव भांडेकर, काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील मारकवार यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, कॉंग्रेसने मला खासदार बनवले, या देशात सन्मानाचे मोठे पद दिले, माझ्या पत्नीला आमदार बनवले. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी मला नावाने ओळखतात. याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणतीही नाही. त्यामुळे मरेपर्यंत कॉंग्रेस सोडणार नाही.

देशासाठी जे बलिदान कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिले, ते भाजपच्या लोकांनी दिलेले नाही. मी ३२ आमदार घेऊन दिल्लीला गेलो होतो. तेव्हा मला पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावले आणि मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की, ३२ आमदारांना घेऊन इंदिरा गांधी स्मृती स्थळावर जायचे आहे. दिलेल्या वचनाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी आमदारांना घेऊन स्मृतीस्थळावर गेलो. तेव्हा आम्ही बघितले की, गांधी कुटुंबाने दिलेले बलिदान तुम्ही आम्ही नाही देऊ शकत. त्यामुळेच देशात कॉंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरतो.

पंडीत जवाहरलाल नेहरूंना १० वर्ष जेलमध्ये टाकण्यात आले होते. ज्या इंदीरा गांधींनी ३२ गोळ्या झेलल्या, त्यांचा एक मुलगा विमान अपघातात मरण पावला. दुसरा मुलगा राजीव गांधींना बॉम्ब स्फोटात उडवून देण्यात आले. अशा परिस्थितीत परदेशातील एक महिला जी या कुटुंबाची सून आहे, तिने या देशाचे नेतृत्व केले. या देशातील सर्व समाज, धर्म यांच्या कुठलाही भेदाभेद न करता सर्व घटकांना एकत्रित ठेवून काम केले आणि आजही करत आहेत. या देशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी स्वप्न बघितले, हे कौतुकास्पद आहे. पण काही शक्तींकडून त्यांना विरोध होतो आहे. पण यावरही लवकरच विजय मिळविता येणार आहे, असे खासदार धानोरकर म्हणाले.

Balu Dhanorkar
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

काही राज्यांतील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आपण पाहिले की, जात, पात, धर्म, पंथ यांच्यात तेढ निर्माण करून प्रचार केला गेला. त्यानंतरही हिंदू मुसलमान तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. पण हे यापुढे चालू देणार नाही. गेल्या निवडणुकीत फार थोड्या मतांनी आपल्या उमेदवारांचा पराभव झाला. पण आपण फार माघारलेलो नाही. माजी नगराध्यक्ष घनश्‍याम मुलचंदानी सोबत नव्हते, ते असते तर मोठा फरक पडला असता, असे सांगत कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पुढील परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in