
Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray News : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांत आजपासून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवगर्जना यात्रा सुरू होणार होती. पण माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत सध्याच येऊ शकत नसल्याने शिवगर्जना तूर्तास रद्द करण्यात आली आहे.
खासदार सावंत यांचा दौरा ठरल्यानंतर पुढील तारखा निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवगर्जना यात्रा होणार आहे, हे काल सायंकाळपर्यंत तरी शहरातील पदाधिकाऱ्यांना माहिती नव्हते. पण नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये बैठकांची जय्यत तयारी झाली होती. त्याच वेळी नागपूर शहरात मात्र शांतता होती. खासदार सावंत यांचा दौरा निश्चित नसल्यामुळे नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांना कदाचित माहिती देण्यात आली नसावी.
शिवसेनेतील बंडानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गमावल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय झाल्यानंतर त्याच दिवशी ‘मी खचलो नाही, तुम्हीही खचू नका’, असे म्हणत ठाकरेंनी सैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. नागपूर ग्रामीणसह इतर चार जिल्ह्यांत हा कार्यक्रम आयोजित केला असताना काल सायंकाळपर्यंत शहरातील पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती नव्हती. त्यामुळे शिंदे सेना-भाजप युतीचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात गर्जना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार बाहेर पडले. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. याचे सर्व खापर महाविकास आघाडीतर्फे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले जात आहे. आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर खासदार व पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी नागपूरसह विदर्भात बैठकांचा धडाका लावला होता. पण नंतर राऊतांनाही अटक झाली आणि त्यानंतर ठाकरे गटाची ही मोहीम थंड बस्त्यात गेली होती. आता खासदार सावंतांवर ठाकरेंनी ही जबाबदारी सोपवली आहे.
विदर्भातील (Vidarbha) मृतप्राय शिवसेनेला (Shivsena) पुन्हा जिवंत करण्यासाठी सर्व जागा लढण्याची घोषणा राऊतांनी केली होती. भाजपला जागा सोडल्यामुळे शिवसेना विदर्भात कमजोर झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. शिवसैनिकाला पुन्हा जागृत करण्यासाठी आपण वारंवार येऊ, असे ते सांगून गेले होते. दोन बैठकांनंतर त्यांनी विदर्भात येणे बंद केले. या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून पक्ष हिरावून घेण्यात आला. सोबतच धनुष्यबाणही गेले. त्यामुळे शिवसेना चांगलीच संतापली आहे आणि कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.