
अकोला : आगामी निवडणुका तोंडावर आल्या आहेत, अन् त्याच्याही आधी पावसाळ्याचा सामना करावा लागणार आहे. हे हेरून महानगरपालिकेत ५ वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या भाजपवर शिवसेनेने निशाणा साधला आहे. हे करताना पालिका प्रशासनालाही सेनेने गंभीर इशारा दिला आहे.
अकोला (Akola) शहरातील नाले सफाईचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोणत्याही प्रभागात नाले सफाईचे कामे गांभीर्याने होताना दिसत नाही. हे महानगरपालिकेत (Municipal Corporation) पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या भाजपचे पाप आहे. त्याची भविष्यात शिवसेना पोलखोल करेल, असा इशारा शिवसेना (Shivsena) शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यांनी प्रशासनालाही आठववडाभराचा वेळ दिला आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शासकीय विश्रामगृहात काल पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील नाले सफाईकडे मनपा प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाकडे माध्यमांचे लक्ष वेधले. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, युवा सेनेचे राहुल कराळे, शरत तुरकर, नितीन मिश्रा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. गतवर्षी तत्कालीन आयुक्त निमा अरोरा यांनी नाले सफाईच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने त्याची मोठी किंमत अकोलेकरांना पावसाळ्यात चुकवावी लागली होती. आता पुन्हा मनपा आयुक्त व प्रशासक कविता द्विवेदी यांच्याकडूनही नाले सफाईबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप राजेश मिश्रा यांनी केला.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दिशाभूल..
अकोला शहरातील चार झोनमध्ये मनपा कर्मचाऱ्यांकडूनच नाले सफाईचे काम करून घेतले जात आहे. एका प्रभागात १२ कर्मचारी काम करतात. नाले सफाईसाठी एकावेळी ३५ ते ४० कर्मचाऱ्यांची गरज असते. याशिवाय पोकलॅन व जेसीबीच्या मदतीने मोठ्या नाल्यांची सफाई करावी लागते. त्यासाठी आवश्यक निधी देण्याची गरज आहे. मात्र, झोन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल केली जात असल्याने नाले सफाईच्या कामात गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप राजेश मिश्रा यांनी केला.
...नाही तर आम्ही गंभीर होऊ!
पावसाळा तोंडावर आले. मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. मुख्य नाल्यांसह शहरातील नाल्यांच्या सफाईबाबत प्रशासनाने गांभीर्याने पावले नाही उचलली तर शिवसेना गंभीर होऊन पावले उचलेल व शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा राजेश मिश्रा यांनी दिला.
जलकुंभी ठरू शकते घातक..
नदी व नाल्यांमध्ये जलकुंभी वाढली आहे. ही जलकुंभी पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक आहे. मात्र, पावसासोबत जलकुंभी वाहून जाईल, या अपेक्षेवर प्रशासन बसले आहे. ही जलकुंभी पावसाळा सुरू झाल्यानंतर घातक ठरून रहिवासी परिसरात नदी, नाल्यांचे पाणी शिरू शकते, याकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले.
येथे घेतला सफाईचा आढावा..
- शिवसेनेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील नाले सफाईचा आढावा घेतला.
- जठारपेठ, अकोट फैल, हरीहर पेठ, बाळापूर नाका, गीतानगर, कैलासनगर आदी परिसरातील नाल्यांची सफाई झाली नसल्याचे दिसून आले.
-बुधवारी सायंकाळपर्यंत नाल्या, मोठे नाले तुंबले असल्याचे छायाचित्रच शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.