हिंगण्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत; खासदार तुमानेंच्या गळाला कोण लागणार ?

काँग्रेस सेवा दलात कार्यरत असलेले कृपाल तुमाने यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश घेतला. पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Eknath Shinde, Krupal Tumane and Uddhav thackeray
Eknath Shinde, Krupal Tumane and Uddhav thackeraySarkarnama

हिंगणा (जि. नागपूर) : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने सहभागी झाले आहेत. त्यांची ही भूमिका हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पटलेली नाही. पक्षाशी एकनिष्ठ न राहता स्वार्थासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. खासदार असताना कधीही पालकत्व न स्वीकारणाऱ्या तुमाने यांच्या गळाला भविष्यात कोणते कार्यकर्ते लागणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असतानापासून रामटेक (Ramtek) लोकसभा व रामटेक विधानसभा क्षेत्रावर शिवसेनेने दावा केला. हा दावा शिवसेनेने आजतागयात कायम ठेवला. काँग्रेस सेवा दलात कार्यरत असलेले कृपाल तुमाने यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश घेतला. पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मधल्या काळात सुबोध मोहिते यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना पहिला खासदार होण्याचा मान मिळाला. त्यांना शिवसेनेने केंद्रीय मंत्री पद दिले होते. यानंतर शिवसेनेतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) सेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ खासदार सुबोध मोहितेसुद्धा शिवसेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश घेतला.

त्यावेळी युपीएचे सरकार केंद्रात होते. मंत्रिपदाची लॉटरी लागणार असा त्यांचा विश्वास होता. यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत मोहिते यांचा पराभव झाला. खासदार म्हणून शिवसेनेचे प्रकाश जाधव निवडून आले. यानंतर सुबोध मोहिते यांचे नावच रामटेक लोकसभा क्षेत्रातून गायब झाले. नंतरच्या काळात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कृपाल तुमाने यांना पुन्हा शिवसेनेने संधी दिली. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करून तुमाने यांनी पहिल्यांदा विजय मिळविला.

रामटेक लोकसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. त्यामुळे पुन्हा तुमाने यांना उमेदवारीची लॉटरी लागली. दुसऱ्यांदाही रामटेक लोकसभेत त्यांचा विजय झाला. आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर सर्वप्रथम आमदार आशिष जयस्वाल त्यांच्या गळाला लागले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या नागपूर येथील बैठकीतही तुमाने अनुपस्थित होते. यानंतर खासदार तुमाने यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. हिंगणा विधानसभा क्षेत्रात खासदार असताना विकास कामासाठी तुमाने यांची कधीही धडपड दिसली नाही, असे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

Eknath Shinde, Krupal Tumane and Uddhav thackeray
ठाकरेंच्या पोटात गोळा : एकनाथ शिंदे गटातील १२ खासदारांचा आकडा पंधरावर जाणार

एक पाहुणा जसा घरी येतो, तसे ते कार्यक्रमात पाहुणे म्हणून यायचे, हा अनुभव जनतेलाही आला आहे. त्यांनी मूळ शिवसेना सोडली असली तरी कार्यकर्त्यांवर मात्र याचा काहीही फरक पडलेला नाही. हिंगणा विधानसभा क्षेत्रातील एकही पदाधिकारी व कार्यकर्ता त्यांच्या संपर्कात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार तुमाने यांनी कोणतीही भूमिका आजवर घेतली नाही. यामुळे पक्षातून ते गेले, हे उत्तम झाले अशी प्रतिक्रिया हिंगणा शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश कन्हेर यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक कायम खंबीरपणे उभा आहे. रामटेक लोकसभा व विधानसभा क्षेत्रात लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा होणार असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. खासदार तुमाने यांचाही जनता सुबोध मोहिते करेल अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. यामुळे भविष्यात शिंदे गटाशी कोणते पदाधिकारी व कार्यकर्ते जुळतात, हे येणारी वेळचं सांगेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com