सरपंच छोटू राऊत यांनी अहेरअल्लीला दिला एक दिवसाचा ग्रामसेवक…

गावविकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी आणि शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, ही सरपंच छोटू राऊत Sarpanch Chotu Raut यांची धडपड होती.
Hitesh, Chotu Raut Aheralli
Hitesh, Chotu Raut AheralliSarkarnama

नागपूर : एक दिवसाचा मुख्यमंत्री लोकांनी ‘नायक’ सिनेमात बघितला. पण ग्रामसेवकांनी गांधी जयंती दिनी होणाऱ्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. गांधी जयंतीला राज्यात कुठेही ग्रामसभा झाल्याचे वृत्त नाही. पण यवतमाळ जिल्ह्याच्या झरी जामणी या आदिवासीबहुल तालुक्यातील अहेरअल्लीचे सरपंच हितेश ऊर्फ छोटू राऊत यांनी ग्रामसेवकांच्या संपावर मात करीत, अनोखी शक्कल लढवीत ग्रामसभा घेतली आणि गावाला एक दिवसाचा ग्रामसेवक दिला.

ग्रामसेवकांना ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्यानंतर ग्रामसभा होणार नाही, हे निश्‍चित होते. पण गावविकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी आणि शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, ही सरपंच छोटू राऊत यांची धडपड होती. त्यासाठी त्यांनी गावातीलच एक सुशिक्षित तरुण आशिष राऊत याला एक दिवसासाठी ग्रामसेवक बनवले आणि ग्रामसभेचे कामकाज पार पाडले. हे करताना सरपंच राऊत यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे समर्थन मिळविले. नियमांची कुठेही पायमल्ली होऊ नये, याची खबरदारी घेतली. त्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. ग्रामसेवकांच्या बहिष्कारानंतरही ग्रामसभा घेणार बहुधा ते एकमेव सरपंच ठरले.

ही सर्व प्रक्रिया पार पाडताना त्यांनी उपसरपंच अनिल राऊत, सदस्य सविता मन्ने, अमृता राऊत, मनीषा दुधकोहळे, पुष्पा राऊत, गजानन सिडाम यांच्याशी प्रथम चर्चा केली आणि एका दिवसासाठी ग्रामसेवक नेमण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी तत्काळ मंजुरी दिली. त्यानंतर छोटू राऊत यांनी गटविकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. गावातील मुख्याध्यापकांना एक दिवसासाठी ग्रामसेवक म्हणून नियुक्त करा, अशी सूचना अधिकाऱ्यांनी त्यांना केली. पण मुख्याध्यापक गावात हजर नसल्याने गावातील पदवीधर तरुणाला ग्रामसेवक बनवण्याची परवानगी द्या, अशी मागणी राऊत यांनी केली.

राऊत यांची ही मागणी अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आणि त्यानंतर आशिष अशोक राऊत या तरुणाला ग्रामसेवक बनवून ग्रामसभेचे कामकाज पार पाडले. गावातील नागरिकांच्या हितासाठी असलेली ग्रामसभा व्हावी, अशी भूमिका सरपंचांनी घेतली आणि कौशल्याने ती घडवून आणली. त्यामुळे छोटू राऊत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाच्या भल्यासाठी एखादे कार्य करायचे ठरवल्यास सर्व अडचणींवर मात करता येऊ शकते, हे राऊत यांनी कृतीतून दाखवले आणि राजकीय पुढाऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Hitesh, Chotu Raut Aheralli
सरकारने ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांना `खूष` केले.. भत्त्यात 400 रुपये वाढवले!!

गाव चोरीला गेल्यावरही दिला होता लढा…

अहेरअल्ली नवीन गावठानचे दस्तावेज कार्यालयातून गायब झाले होते. अनेकदा पत्रव्यवहार करूनही ते सापडत नव्हते. त्यानंतर छोटू राऊत यांनी या प्रकाराची तक्रार केली. लालफितशाहीचा कळस म्हणजे त्यांनी केलेली तक्रारही गायब झाली. त्यानंतर त्यांनी गाव चोरीला गेल्याचा आरोप केला. हे वृत्त ‘सरकारनामा’मध्ये आल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यानंतर प्रशासनाने त्यांना नवीन गावठानचे दस्तावेज उपलब्ध करून दिले. तक्रारच गायब झाल्यानंतर हतबल न होता राऊत यांना त्यातही मार्ग शोधून काढला, हे उल्लेखनीय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com