Sanjay Rathod : संजय राठोडांना आनंद दिघेंचा विसर पडला, की जाणीवपूर्वक..?

एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील एक शिलेदार संजय राठोड (Sanjay Rathod) मात्र आनंद दिघे यांनाच विसरले.
Sanjay Rathod, Shivsena
Sanjay Rathod, ShivsenaSarkarnama

नागपूर : एकेकाळी शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले ठाण्याचे जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे यांचे नाव घेऊन आणि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे करून ‘कर्मवीर’ एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उद्या मुंबईतील बीकेसी मैदावावर बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी दसरा मेळावा आयोजित केला. त्यासाठी आपल्या शिलेदारांना त्यांनी कामी लावले. पण त्यांचे विदर्भातील एक शिलेदार संजय राठोड (Sanjay Rathod) मात्र आनंद दिघे यांनाच विसरले.

यवतमाळ (Yavatmal) जिल्‍यातून गेलेल्या बसेसवर असलेल्या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shince) आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे फोटो आहेत. तर वाशीम जिल्ह्यातून गेलेल्या बसेसवर शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, (Balasaheb Thackeray) आनंद दिघे, (Anand Dighe) एकनाथ शिंदे आणि भावना गवळी यांचे फोटो आहेत. शिवसेनेतून ४० आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या बळावर भाजपसोबत हातमिळवणी करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि आज शक्तिप्रदर्शनाची वेळ आली असताना कर्मवीरांनी राज्यभरातून समर्थक मुंबईच्या बीकेसीवर नेण्याची व्यवस्था केली. यासाठी शिंदे सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याला टारगेट देण्यात आले. शिंदे सरकारमधील सर्व मंत्रीही यासाठी ‘तब्येत’नी भिडले आणि जास्तीत जास्त शिवसैनिक (शिंदे सैनिक) मुंबईला बीकेसीच्या मैदानावर नेण्यासाठी स्पर्धा लागली. विदर्भातही यासाठी मोठी स्पर्धा लागली.

शिवसेनेचे विदर्भात एकमेव मंत्री संजय राठोड आहेत. त्यांनीही एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी ‘शक्ती’निशी प्रयत्न केले आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातून ४० ते ५० बसेस मुंबईसाठी आज रवाना झाल्या. विदर्भातून रवाना झालेल्या सर्व बसेसवर शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्याचे ‘दसरा मेळावा - प्रमुख मार्गदर्शक मा. एकनाथ संभाजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य’ असे पोस्टर लागले आहेत. विदर्भाच्या यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यांतून रवाना झालेल्या बसेसवर जे पोस्टर्स लागलेले आहेत, त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लागलेले आहे. पण ‘सरकारनामा’ला मिलालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातून मुंबईसाठी रवाना झालेल्या बसेसवर लागलेल्या पोस्टर्सवर आनंद दिघे यांचे छायाचित्र नाहीये.

Sanjay Rathod, Shivsena
दसरा मेळावा : सत्य परेशान हो सकता है पराजित नही; उद्धव ठाकरेंचा दरारा कायम!

संजय राठोड यांना आनंद दिघे मान्य नाहीत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य नाही, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. परवा परवा पालकमंत्री म्हणून वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राठोड यांच्या भोवताल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थक (शिंदे गटात गेल्यावर ज्यांनी सर्वप्रथम संजय राठोडांचा विरोध केला, ते) लोक त्यांच्या भोवताल दिसले. ‘सरकारनामा’ने तसे वृत्त दिले होते. त्यामुळे आता संजय राठोड पुन्हा ‘बॅक टू पव्हेलीयन’ची तयारी तर करत नाहीये ना, असाही प्रश्‍न राजकीय जाणकारांना पडला आहे.

संजय राठोड वा त्यांचे कार्यकर्ते आनंद दिघेंचा फोटो बसच्या पोस्टरवर लावायचा विसरले असतील, हा युक्तिवाद पचनी न पडण्यासारखा आहे. त्यामुळे राठोडांनीच तर तसे आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले नसतील ना, असाही प्रश्‍न सध्या यवतमाळ जिल्ह्यात आणि एकंदरीतच विदर्भात चर्चिला जात आहे. उद्या हाच प्रश्‍न उभा महाराष्ट्र विचारणार आहे. याची जाणीव खुद्द संजय राठोड यांना नसेल, हेसुद्धा न पटण्यासारखे आहे. त्यामुळे संजय राठोड यांची भूमिका नेमकी आहे काय, याचे उत्तर उद्या महाराष्ट्र शोधणार, हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com