Rathod : संजय राठोड उद्धव सेनेच्या गराड्यात; शिवसैनिक झुंजविण्यासाठीच वापरला जातो का?

पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासाठी उद्धव सेनेचे कार्यकर्ते पायघड्या टाकत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता झुंजविण्यासाठीच वापरला जातो का, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.
Sanjay Rathod at Washim
Sanjay Rathod at WashimSarkarnama

वाशीम : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची सेना ही शिंदे सेना नावाने ओळखली जाऊ लागली. तेव्हापासून सामान्य शिवसैनिक गोंधळात सापडला, तो आजही गोंधळातच आहे. याचे ताजे उदाहरण काल वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथे बघायला मिळाले. शिंदे सेनेचे पालकमंत्री संजय राठोड काल उद्धव सेनेच्या शिलेदारांच्या गराड्यात बघायला मिळाले. त्यामुळे मूळ शिवसैनिकांमधील संभ्रम अधिकच वाढला आहे.

राज्याच्या राजकारणात शिवसेनेतील (Shivsena) सुंदोपसुंदी टोकाला गेली असताना वाशीम (Washim) जिल्ह्यात मात्र शिंदे (Eknath Shinde) सेनेच्या पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात उद्धव (Uddhav Thackeray) सेनेचे शिलेदार पालकमंत्र्यांना गराडा टाकून दिसल्याने दोनही सेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर मातोश्रीवर जाऊन आणाभाका घेणारे नेते पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासाठी उद्धव सेनेचे कार्यकर्ते पायघड्या टाकत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता झुंजविण्यासाठीच वापरला जातो का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. संजय राठोड यांचा शिरपूर दौरा शिंदे सेनेला बेदखल करण्यासाठी होता की पुन्हा शिंदे सेनेतील जुनी गटबाजी चुचकारण्यासाठी, हीच चर्चा राजकीय गोटात आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडत भाजपच्या साथीने सत्ताशकट हाती घेतला. तेव्हापासून राज्यात शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना एकमेकासमोर उभी ठाकले आहे. ही राजकीय लढाई रस्त्यावरही लढली जात आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा राजकीय धुमशान सुरू झाली असताना शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड यांचे मन अजूनही जुन्या घरातच रमले की काय असा प्रश्न निर्माण करणारी घटना वाशीम जिल्ह्यातील जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपुरात घडली. संजय राठोड एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे वाशीम व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बहाल केले गेले.

काल संजय राठोड पालकमंत्री म्हणून शिरपूर येथे आले होते. या कार्यक्रमाला शिंदे गटातील नेते व शिवसैनिक उपस्थित राहणार, हे अपेक्षित असताना या कार्यक्रमात चक्क उद्धव सेनेचे विश्वनाथ सानप व अशोक अंभोरे यांची उपस्थिती राजकीय जाणकारांच्या भुवया उंचाविणारी ठरली. मुख्य म्हणजे विश्वनाथ सानप व अशोक अंभोरे हे दोन नेते उद्धव सेनेशी एकनिष्ठ असल्याचे पुरावे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून जिल्ह्यात दवंडी पिटवून सांगितले गेले असताना पालकमंत्री संजय राठोड उद्धव सेनेच्या गराड्यात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर विश्वनाथ सानप व अशोक अंभोरे शिंदे गटावर टिका करण्यात आघाडीवर होते. मोर्चे, निदर्शनातही यांचा सहभाग लक्षणीय होता, असे असताना पालकमंत्री शिंदे गटाच्या वजाबाकीचे राजकारण करून काय साध्य करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sanjay Rathod at Washim
Shivsena : संजय राठोड यांचे पाठीराखे, बंजारा काशीचे महंत लागले उद्धव ठाकरेंच्या गळाला !

पुन्हा गटात तट

एकसंघ शिवसेनेत संजय राठोड यांच्याकडे पालकमंत्रिपद असताना जिल्ह्यात शिवसेनेची दोन गटांत विभागणी करण्याचे श्रेय संजय राठोड यांच्याकडेच जाते. आता खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड एकाच गटात असताना पालकमंत्र्यांच्या दौरा स्थानिक खासदार किंवा जिल्हाप्रमुख यांना माहिती नसणे हा योगायोग नक्कीच होऊ शकत नाही. राज्यस्तरावर शिंदे गट आपली संघटन बांधणी युध्दस्तरावर करत असताना खुद्द त्यांचा शिलेदार पालकमंत्रीच आपल्या गटाला अव्हेरून उद्धव सेनेच्या गराड्यात धन्यता मानत असेल, तर शिंदे गट वाढेलच कसा असा प्रश्न कार्यकर्ते स्व:तलाच विचारत आहेत.

आम्ही फक्त लढायचेच का?

शिंदे गट व उद्धव ठाकरे गटात प्रचंड राजकीय असूया निर्माण झाली आहे. दोनही गट मोर्चे निदर्शनाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे राहत आहेत. काही ठिकाणी राडेसुद्धा झालेले आहेत. या रस्त्यावरच्या लढाईत सर्वसामान्य शिवसैनिक आपल्याच आप्ताच्या विरोधात टोकाचा विरोध करत आहे. नेते मात्र कार्यकर्त्यांच्या भावना बाजूला सारत प्रतिस्पर्ध्यांच्या छावणीत डेरे टाकत असतील, तर आम्ही फक्त लढायचेच का असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com