Sanjay Rathod News : राठोड गिरवत आहेत भूमरेंचाच कित्ता, अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचीही पायपीट !

Washim : लोकप्रतिनिधी जनसेवक व अधिकारी लोकांचे सेवक ही व्यवस्था अभिप्रेत आहे.
Sanjay Rathod and Sandipan Bhumre
Sanjay Rathod and Sandipan BhumreSarkarnama

यापूर्वीचे यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भूमरे छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) येथून यवतमाळ जिल्ह्याचा कारभार चालवत होते. तेव्हा जिल्ह्यातील लोक त्यांच्यावर प्रचंड चिडून होते. ते विदर्भाच्या बाहेरचे होते. त्यामुळे तो विषय फार कुणी मनावर घेतला नाही. पण यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री संजय राठोड हेसुद्धा भूमरेंचाच कित्ता गिरवत असल्याने जनता आश्‍चर्य व्यक्त करीत आहे.

संजय राठोड यवतमाळ जिल्ह्याचेच आहेत आणि वाशीम हा त्यांच्या शेजारचा जिल्हा आहे. तरीही त्यांनी वाशीम जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधी जनसेवक व अधिकारी लोकांचे सेवक ही व्यवस्था अभिप्रेत आहे. पण ज्यांच्याकडे वाशीमसारख्या आकांक्षित जिल्ह्याचे पालकत्व आहे, त्या पालकमंत्र्यांनाच जिल्ह्यात फिरकायला वेळ नसल्याने लोकप्रतिनिधी राजा व प्रशासकीय अधिकारी निरंकुश सरदार अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे.

जिल्ह्यातील विविध योजनांचे लोकार्पण यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात उरकण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. पालकमंत्री संजय राठोड पोहरादेवी व्यतिरिक्त इतरत्र चार दोन भेटीचेच पालकमंत्री ठरले असून या जिल्ह्यात अनेक लोककल्याणकारी योजनांची वासलात लागत असल्याचे चित्र आहे. वाशीम जिल्हा आधीच मानव विकास निर्देशांकात तळाला आहे. केंद्र सरकारने या जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले आहे.

आधीच विकासाच्या राजकीय इच्छाशक्तीत आकांक्षित ठरलेल्या जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर दिली. मात्र या जबाबदारीचे सुरुवातीपासून मंत्री संजय राठोड यांना ओझे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीला पोहरादेवी वगळता इतर ठिकाणी पालकमंत्री चारदोन वेळा केवळ धावत्या भेटीवर आले अन् गेले. आता तर जिल्ह्यातील विकासाच्या योजनांच्या माहिती दस्तऐवजांचे लोकार्पण करण्यासही पालकमंत्र्यांना वेळ नाही.

Sanjay Rathod and Sandipan Bhumre
Sanjay Rathod : संजय राठोडांना आनंद दिघेंचा विसर पडला, की जाणीवपूर्वक..?

जिल्ह्यात सध्या सामाजिक न्याय पर्व सुरू आहे. या पर्वानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना व इतर योजनांची माहिती व्हावी, यासाठी व्हिडिओ जिंगल्स तयार केले होते. तसेच काही विद्यार्थ्यांना महाज्योती टॅबचेही वितरण नियोजित होते. अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार निवारण कायद्याबाबत जनजागृतीसाठी माहिती विभागाने सलोखा पुस्तिका तयार केली, मात्र याचे अनावरण करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड जिल्ह्यात फिरकतच नसल्याने प्रशासनाला हेलपाटे घेत यवतमाळ गाठावे लागले.

यवतमाळात (yavatmal) पालकमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुस्तिका, जिंगल्सचे लोकार्पण व महाज्योतीकडून प्राप्त टॅबचे वितरण कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील श्रीजय निंगोट आणि धनज (बु) येथील प्रद्युम्न बोरकर या इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यासाठी या विद्यार्थ्यांनाही यवतमाळात पायपीट करावी लागली. वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन दशक झाली असताना वाशीम जिल्ह्याच्या प्रशासनाला यवतमाळ जिल्ह्यात धाव घ्यावी लागत असेल तर एकतर जिल्हा बदला अन्यथा पालकमंत्री बदला, अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

Sanjay Rathod and Sandipan Bhumre
Sandipan Bhumre News : उद्धवसाहेबांची लय मोठी सभा झाली, साहेब आपल्याला बी घ्यावं लागलं ; कार्यकर्त्याचा हट्ट्..

ना धाक ना नियोजन..

पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या पालकत्वाच्या काळात प्रशासन शिरजोर झाले आहे. जाब विचारणारे पालकमंत्रीच (Guardian Minister) फिरकत नसल्याने कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही. अनेक कल्याणकारी समित्यांचे गठण झालेच नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांना वाशीमचे (Washim) पालकत्व ओझे वाटत असेल तर त्यांनी ते झुगारून देऊन त्यांच्याच जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com