सरपंचपदाचे आरक्षण चुकले, मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित...

गावागावांत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना मात्र आता निवडणूक स्थगित झाल्याने उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित झाली होती.
Bhandara
BhandaraSarkarnama

भंडारा : सरपंचपदाच्या आरक्षणात झालेल्या चुकीने भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने २२ नोव्हेंबरला दिले आहेत. चुकीचे आरक्षण काढणाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचेही या आदेशात म्हटले आहे. निवडणूक स्थगित झाल्याची माहिती होताच तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गावागावांत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना मात्र आता निवडणूक स्थगित झाल्याने उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित झाली होती. त्यात मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींचा समावेश होता तहसीलदारांनी निवडणूक नोटीसही प्रसिद्ध केली होती. २८ नोव्हेंबरपासून नामांकनाला प्रारंभ होणार होता. मात्र राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) मोहाडी तालुक्यातील सर्व ५८ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य निवडणुकीला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) ग्रामपंचायत अधिनियमामध्ये शासनाने केलेल्या सुधारणेनुसार सरपंचपदाची (Sarpanch) निवड थेट जनतेतून होणार आहे.

मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्याने आता नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविणे आवश्यक झाले आहे. मात्र ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमान्वये निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने या मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच मोहाडीच्या तहसीलदारांनी प्रसिद्ध केलेली निवडणूक नोटीसही या आदेशाने रद्द करण्यात आली आहे.

मोहाडी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत ५ फेब्रुवारी २०११ रोजी काढण्यात आली होती. त्यावेळी १९९५ पासूनचे म्हणजे पाच टर्मचे आरक्षण विचारात न घेता २००५ पासूनचे आरक्षण लक्षात घेऊन सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावर तत्काळ आक्षेप घेत जांभोराचे यादवराव मुंगमोडे, खडकीचे बाबूजी ठवकर, डोंगरगावचे जगदीश पंचभाई आणि टांगा येथील ईश्वर बोंदरे यांनी तहसीलदारांकडे आक्षेप नोंदविला. त्यात चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढल्याने अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांवर अन्याय होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

Bhandara
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

१५ नोव्हेंबर २०२१ रोजी भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे फेर आरक्षणाची मागणीही करण्यात आली, मात्र त्यांच्या या तक्रारीचा विचार न करता आरक्षण जाहीर करण्यात आले. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी मोहाडी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या आरक्षणाचा अहवालही सादर केला. दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यात मोहाडी तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींचा समावेश होता. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये शासनाने केलेल्या सुधारणेनुसार थेट सरपंचपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. परिणामी नामांकन दाखल करण्याच्या सहा दिवस आधी मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित करण्याची वेळ आली. निवडणूक आयोगाने चुकीचे आरक्षण काढणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून आता कुणावर कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान मोहाडी तालुक्यात सर्वत्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली होती. गावागावांत पॅनल तयार करून सरपंचपदाचे उमेदवार जवळपास निश्चितही करण्यात आले होते. आरक्षित जागांवर निवडणूक लढण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवही झाली होती. मात्र आता निवडणूक रद्द झाल्याने सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. आता या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न आता मोहाडीकर विचारत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in