सोयाबीन-कापूस प्रश्‍नावर रविकांत तुपकरांची आज अजित पवारांसोबत बैठक...

वाशीम जिल्ह्यातील Washim District रिसोड येथे कापूस - सोयाबीन परिषद पार पडली आणि राजू शेट्टी Raju Shetti यांनी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात विदर्भ, मराठवाडाव्यापी आंदोलनाची घोषणा केली.
सोयाबीन-कापूस प्रश्‍नावर रविकांत तुपकरांची आज अजित पवारांसोबत बैठक...
Ajit Pawar and Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन चिघळल्यानंतर राज्य शासनाने तुपकरांना चर्चेसाठी निमंत्रण दिले. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज दुपारी अडीच वाजता बैठक होऊ घातली आहे. राज्य मंत्रिमंडळातील तब्बल ९ मंत्री आणि संबंधित विभागाचे उच्च पदस्थ अधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

सोयाबीन-कापूस प्रश्नावर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विदर्भ व मराठवाडाव्यापी आंदोलन उभारण्यात आले होते. ३१ ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एलगार मोर्चा धडकला आणि याच मोर्चात तुपकरांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात दौरा केला. ११ नोव्हेंबर रोजी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे कापूस - सोयाबीन परिषद पार पडली आणि राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात विदर्भ, मराठवाडाव्यापी आंदोलनाची घोषणा केली.

तुपकरांनी १७ नोव्हेंबर रोजी देशाचा केंद्रबिंदू आणि राज्याची उपराजधानी नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करून नागपूर पोलिसांनी जबरदस्तीने तुपकरांना ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात १८ नोव्हेंबरच्या सकाळी बुलडाण्यात आणून सोडले. मात्र तुपकरांनी त्यांच्या निवास्थानासमोरच आपले आंदोलन पुढे सुरू ठेवले. या दरम्यान रविकांत तुपकर यांची प्रकृती अधिक खालावली तर दुसरीकडे गावागावांत सरकारविरोधात रोष निर्माण झाला, प्रभात फेरी, रास्तारोको, धरणे आणि गावबंद अशा आंदोलनास सुरुवात झाली.

शेख रफीक या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. परंतु त्यानंतर कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी चिखली रस्त्यावर उतरून रास्तारोको केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद उफाळून राडा झाला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे वाहन तोडले, रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. तर रात्री उशिरा तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते. २० नोव्हेंबर रोजी तुपकर यांच्या अन्नत्यागाचा चौथा दिवस होता त्यांची प्रकृती खालावली होती. पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी या आंदोलनात मध्यस्थी केली.

Ajit Pawar and Ravikant Tupkar
आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सूचनेवरून डॉ. शिंगणे सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले. राज्य सरकारने तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानुसार आज मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक होत आहे. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी विभागाचे सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, सहकार आयुक्त, पणनचे संचालक यांच्यासह अन्य सर्व संबंधित अधिकारी राहणार आहेत. रविकांत तुपकर या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या आणि सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य शासनासमोर मांडणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in