रविकांत तुपकरांचे आंदोलन चिघळले, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

शेतकरी भावांसाठी Farmers जीव गेला तरी बेहत्तर पण आता माघार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी Ravikant Tupkar घेतली आहे.
रविकांत तुपकरांचे आंदोलन चिघळले, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…
Agitation of Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर १७ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे. कापूस आणि सोयाबीनला रास्त भाव मिळण्यासाठी त्यांचा हा संघर्ष सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने हे आंदोलन चिघळत चालले आहे.

या निष्ठुर सरकारला शेतकऱ्यांचे आणखी बळी पाहिजेत का? किती बळी पाहिजेत, असे म्हणत स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी शेख रफिक यांना वेळीच रोखले आणि अनर्थ टळला. तुपकरांनी नागपूरच्या संविधान चौकातून आंदोलनाची सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी सांगितले होते की, सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. त्यानुसार आज स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघावयास मिळाले.

आज सकाळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन वासेकर आणि निवासी वैद्यकीय अधिकारी भुसारी यांनी तुपकरांची तपासणी केली. तेव्हा त्यांची शूगर कमी झाली होती आणि रक्तदाब उच्च झाला होता. पण कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळाल्याशिवाय अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही, अशी प्रतिज्ञा तुपकरांनी १७ नोव्हेंबरला घेतली होती. त्यावर ते आजही कायम राहिले. शेतकरी भावांसाठी जीव गेला तरी बेहत्तर पण आता माघार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.

Agitation of Ravikant Tupkar
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली...

आज सकाळी त्यांची आई गीताबाई चंद्रदास तुपकर यांनी ‘माझा पोरगा गुंडा नाही, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो आहे. त्याच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास, सरकार जबाबदार राहील’, असे म्हटले. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी माझा पोरगा लढत आहे. तो कुणी डाकू नाही, गुंडगिरी करत नाही, शेतमालाला भाव मिळावा, यासाठी ३ दिवस झाले त्याने अन्नाचा कण देखील खाल्लेला नाही. आज त्याची तब्येत फार खराब झाली. तो अदानी, अंबानी नाही, कष्टाने कमावलेल्या मालाला भाव मागतोय. त्याच्या आईवडिलांच्या आणि सर्व शेतकऱ्यांच्या घामाला भाव मागतोय. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला आहे, असे गीताबाईंनी म्हणत सरकारला साद घातली होती. पण अद्यापही सरकारने प्रतिसाद दिलेला नाही.

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोदी सरकार झुकले पण विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस-सोयाबीनसाठी सरकार काहीच करत नाहीये. सरकारने स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेत कापूस-सोयाबीनच्या बाबतीत निर्णय घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा ईशाराही दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in